आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन लक्षात घेता असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची व विशेषतः स्थानिक जाणकारांची मदत घेऊन आगामी काळात योग्य तो प्लान बनविण्यासाठी प्रयत्न करू, जेणेकरून कोणाचा जीव जाऊ नये असे नियोजन करू, असे युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

आदित्य ठाकरे दोडामार्ग, झोळंबे येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले, कोकणासह सबंध राज्यात या वर्षी पावसामुळे आपत्ती आली. त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. काही मदत हवी असल्यास शिवसैनिकांना सांगा. ते नक्की तुमच्यासाठी धावत येतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, उपजिल्हाप्रमुख गणेश प्रसाद गवस, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, सज्जन धाऊसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.