
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सांगली आणि कोल्हापुरात दररोज रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असला तरी रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नव्हती. परिणामी रुग्ण संख्येतही घट होण्याऐवजी वाढच होताना दिसत होती. त्यामुळे सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. त्याची अंमलबजावणी आजपासून शहरात आणि जिह्याच्या इतर भागात सुरू झाली आहे, त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला.
कोल्हापुरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरात राहणेच पसंत केले. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता.

































































