
सांगली जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत असताना, कर्नाटकच्या भाजप सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. मात्र, त्याचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. पुण्याहून दररोज एक ऑक्सिजन टॅँकर सांगलीला पाठविण्याचा निर्णय मुंबईत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत तातडीने घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. या रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असल्याने केंद्र शासनाने कर्नाटक सरकारला सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांसाठी तीस मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा बेल्लारी येथून करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक टँकर अशा तीन टँकरने ऑक्सिजन पुरवठा गेले दहा-बारा दिवस केला जात होता. मात्र, बुधवारी रात्रीपासून महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचा निर्णय कर्नाटकच्या भाजप सरकारने घेतला आहे. या तिन्ही जिल्ह्यातील अनेक रुग्ण येथील ऑक्सिजनवर अवलंबून होते. सांगली जिल्ह्याला सध्या जेमतेम ऑक्सिजन पुरवठा होतो आहे. त्यात कर्नाटक सरकारने पुरवठा बंद केल्याने आरोग्य यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या तिन्ही जिह्यांत कोरोनाची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे. सांगलीत रुग्णसंख्या दररोज दोन हजारांच्या घरात पोहोचली आहे. सांगली जिल्ह्याला दररोज 50 ते 60 टन ऑक्सिजनची गरज असताना सध्या 25 ते 30 टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकचा दररोज दहा टनांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सांगली जिल्ह्याला केवळ 15 ते 20 टनच ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.
जिल्हा प्रशासन सज्ज; पुण्याहून ऑक्सिजन येणार – जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती
n कर्नाटक शासनाने ऑक्सिजन पुरवठा अचानकपणे बंद केला आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधितांचा मृत्यू होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत आज मंत्रालयात तातडीची बैठक घेतली आणि पुणे येथून सांगलीला दररोज एक टँकर ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

































































