
राज्य शासनाने जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव येथे नवीन बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जिल्ह्यात तीन बाजार समिती नव्याने तयार होतील, तर सांगली बाजार समितीच्या विभाजनातून स्वतंत्र जत, कवठेमहांकाळ बाजार समिती अस्तित्वात येणार आहे. स्वतंत्र बाजार समित्या करण्याची कार्यवाही करावी का? असा अभिप्राय जिल्हा उपनिबंधकांनी पणन संचालकांकडे मागितला आहे. तसेच सांगली बाजार समितीच्या सर्व मालमत्तांचा अहवालही त्यासोबत सादर करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात दहा तालुके असले, तरी बाजार समिती मात्र सात आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात बाजार समिती, या शासन धोरणानुसार जिल्ह्यात कडेगाव, जत आणि कवठेमहांकाळ या नव्या बाजार समितींची निर्मिती होणार आहे. याबाबत १७ एप्रिल रोजी सहकार विभागाचा शासनादेश जारी झालेला असला, तरी सहकार आयुक्तांचे अद्यापि कुठलेही पत्र वा आदेश नाहीत, त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या हालचाली थंडावल्या आहेत. शासनाने सांगली बाजार समितीमधून जत, कवठेमहांकाळ आणि खानापूरमधून कडेगाव स्वतंत्र बाजार समितीची घोषणा केली.
सांगली बाजार समितीमधून जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समिती होणार आहे. तसेच खानापूर तालुक्यातून कडेगावला बाजार समिती होणार आहे. त्यानुसार कडेगाव बाजार समितीला थोडा वेळ लागेल. पण, जत आणि कवठेमहांकाळसाठी तीन आठवड्यांत स्वतंत्र बाजार समित्या होऊ शकतात. पणन संचालकांकडे मागितलेल्या अभिप्रायानंतर सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील एक अधिकारी नियुक्ती करून सर्व कामकाज पाहण्यात येणार आहे.
सांगली बाजार समितीच्या विविध बँकांमध्ये असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुदतीठेवी आहेत. जत आणि कवठेमहांकाळ उपबाजार आवारामध्ये स्वतंत्र बाजार समिती होणार आहेत. सांगली बाजार समितीमधून त्रिभाजन झाल्यानंतर ठेवींचीही विभागणी होणार आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांचीदेखील विभागणी होणार आहे.
सांगली बाजार समितीमधून जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या करण्यात येणार आहेत. शासनाने सांगली बाजार समितीच्या मालमत्तांची माहिती मागवली होती. त्यानुसार संपूर्ण माहिती पणन विभागाला सादर करण्यात आली आहे. त्यानंतर पुढे काय कार्यवाही करावी, यासंबंधीचा अभिप्राय पणन संचालकांकडून मागवला आहे. या अभिप्रायानंतर जत, कवठेमहांकाळला स्वतंत्र बाजार समिर्ती स्थापन करण्याचा निर्णय होणार आहे.
कडेगाव स्वतंत्र बाजार समितीला होणार विलंब
खानापूर बाजार समितीमधून कडेगावसाठी स्वतंत्र बाजार समिती होणार आहे. कडेगाव बाजार समितीसाठी जागेची मागणी तहसीलदारांच्याकडे केली आहे. जागेची उपलब्धता झाल्यानंतर इमारत, शेतमाल सौद्यासाठी हॉल, आदी मूलभूत सुविधा तिथे उभा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे कडेगावच्या स्वतंत्र बाजार समितीस बराच विलंब होण्याची चिन्हे आहेत.