Sangli Shaurya Patil Case – मुख्याध्यापिकेसह 4 शिक्षक निलंबित, पोलिसात गुन्हा दाखल

सांगलीच्या शौर्य पाटील (वय – 16) या दहावीतील विद्यार्थ्याने शिक्षकांच्या छळाला कंटाळून दिल्लीत आत्महत्या केली. मेट्रो स्टेशनच्या पुलावरून उडी मारून त्याने जीवन संपवले. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी शौर्यने एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. यात त्याने शाळेच्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले. चिठ्ठीत त्याने तीन शिक्षकांची नावेही लिहिली होती. मंगळवारी ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शाळा व्यवस्थापनाने कठोर पाऊल उचलत मुख्याध्यापकांसह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

शौर्यच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील प्रदीप पाटील यांनी 5 वी ते 10 च्या मुख्याध्यापिका अपराजिता पाल, शिक्षिका ज्युली वर्गीस, मनु कालरा आणि युक्ती अग्रवाल-महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक रॉबर्ट फर्नांडिस यांनी पुढील सुचनेपर्यंत मुख्याध्यापिकेसह 4 शिक्षकांना निलंबित केले आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना परवानगीशिवाय शाळेत येण्यास, विद्यार्थी, कर्मचारी किंवा पालकांशी संवाद साधण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

शाळेने नोटीस पाठवत मुख्याध्यापिकेसह शिक्षकांना शाळेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तुमच्याविरुद्ध तीस हजारी कोर्टात दाखल एफआयआर आणि आरोपांचे गार्भीर्य लक्षात घेता तुम्हाला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आणि पुढील आदेश येईपर्यंत निलंबनाची कारवाई सुरुच राहील. निलंबनाच्या कालावधीमध्ये तुम्हाल चौकशीसाठी हजर रहावे लागेल आणि प्रशासनाच्या लेखी परवानगीशिवाय शाळेच्या परिसरात येऊ नये, किंवा विद्यार्थी, कर्मचारी व पालकांशी संवाद साधू नये, असे आरोपी शिक्षकांना बजावण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

शौर्य पाटील हा दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर शौर्य थेट राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर गेला आणि दप्तरासह तिथल्या पुलावरून उडी घेतली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शौर्यच्या बॅगेत पोलिसांना हाताने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. शाळेतील छळाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे त्याने त्यात लिहिले असून त्यात तीन शिक्षकांची नावे लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांबद्दल मी काय बोलू? माझ्यासारखी वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये. त्यासाठी मला त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हायला हवी. ही माझी शेवटची इच्छा आहे. सर्वांनी माझ्यासाठी खूप केलं, पण मी त्यांना काही देऊ शकलो नाही. मी तुम्हाला बऱ्याचदा दुखावलं, आता शेवटचं दुःख देतोय, असे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. माझ्या शरीरातील काही अवयव चांगल्या स्थितीत असतील तर ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, अशी विनंती त्याने चिठ्ठीत केली आहे.

वडिलांचा दागिन्यांचा व्यवसाय

शौर्यचे घर दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये असून त्याचे वडील प्रदीप पाटील यांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. 18 नोव्हेंबर रोजी ते आईच्या उपचारांसाठी गावी आली होती. त्याने सांगितले की, शौर्य नेहमीप्रमाणे सकाळी 7.15 वाजता शाळेत गेला होता. दुपारी 2.45 वाजता तो मेट्रो स्टेशनवरून पडला आणि त्याला बीएलके रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचा फोन आला.

घटनेच्या दिवशी काय घडलं?

वर्षभरापासून शाळेतील शिक्षक शौर्यला त्रास देत होते. सर्वांसमोर त्याचा अपमान करत होते, त्याची खिल्ली उडवत होते. त्याचे वडील प्रदीप पाटील यांनी शाळेत याबाबत तक्रारही केली होती. त्यानंतर हा त्रास जास्तच वाढला. मंगळवारी शाळेत त्याचा नृत्याचा सराव होता. सराव करता करता तो पडला. त्यावेळी त्याला सावरण्याऐवजी शिक्षकांनी दम भरला. कितीही रड, आम्हाला फरक पडत नाही, असे एक शिक्षक म्हणाला. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला आणि त्याने स्वतःला संपवले.