
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनजवळ रविवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ट्रक आणि क्वॉलिस या दोन गाडय़ांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून गाडीत अडकून पडलेल्या क्वॉलिस चालकाची सुटका करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी दिली.
या अपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. क्वॉलिस गाडीचा चालक अपघातानंतर गाडीमध्ये अडकून पडला होता. त्याला वाहनचालक आणि पोलिसांनी गाडीबाहेर काढून गंभीर जखमी अवस्थेत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
यामुळे महामार्गावरची वाहतूक काही विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. अपघातग्रस्त क्वॉलिसमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून गाडीत एकूण सात प्रवासी होते. उर्वरित चौघांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताबाबत संगमेश्वर पोलीस मदतकार्य आणि तपास करीत आहेत.



























































