
सामना प्रतिनिधी। संगमेश्वर
गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून असंख्य पर्यटक येत असतात. गणपतीपुळे येथे विविध ठिकाणांहून पर्यटक घेऊन येण्यामध्ये राज्य परिवहन मंडळाचा मोठा सहभाग आहे. असे असतांना येथील बसस्थानकात असणाऱ्या गैरसोयींमुळे चालक वाहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या रत्नागिरी विभागाने येथील बसस्थानकात असणाऱ्या गैरसोयींकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे. याबाबत येथील शिवसैनिक परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सविस्तर निवेदन देणार आहेत.
गणपतीपुळे बसस्थानकात पाण्याची टाकीची दुरावस्था झाली आहे. टाकी फुटली असून त्यात पालापाचोळा व कचरा पडला आहे. तसेच राहण्यासाठी येथे येणाऱ्या बसवर काम करणाऱ्या चालक वाहकांच्या निवासाची व्यवस्थाही येथे नसल्याने चालक वाहक त्रस्त झाले आहेत. तसेच कार्यालयही कुलूप लावून बंद ठेवले जात असल्याने उन वारा पाऊस झेलत चालक वाहकांवर बसमध्येच झोपायची वेळ येते. प्रचंड डासांमुळे दिवसभर थकलेल्या चालक वाहकांना धड झोपही मिळत नाही. स्वच्छता गृहात पाणी नसल्याने चालक वाहकांची गैरसोय होत आहे.
व्यवस्थापनाने चालक वाहकांना विश्रांतीसाठी येथे असणाऱ्या जागेची चावी द्यावी ही मागणी देखील अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. परिणामी राहण्याची आणि पाण्याची कोणतीही सोय गणपतीपुळे बसस्थानकात उपलब्ध नसल्यामुळे यापूर्वी वस्तीला असणाऱ्या पाच बसची संख्या कमी होवून ती एकवर आली आहे. सध्या या बसस्थानकात पुणे गणपतीपुळे ही वर्षानुवर्षे सुरु असणारी एकच बस वस्तीला असते. मात्र या चालक वाहकांचे गैरसोयींमुळे होणारे हाल लक्षात घेता ही बस देखील काही दिवसांनी बंद होईल , अशी भिती काही प्रवाशांनी देखील व्यक्त केली आहे.
































































