
सामना प्रतिनिधी, संगमेश्वर
संगमेश्वर (नावडी) बाजारपेठेत अतिक्रमण करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने नोटीस धाडल्या असून दोन दिवसांत अतिक्रमण हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देण्यात आला आहे. नावडी बाजारपेठ शास्त्री आणि सोनवी नदीच्या संगमावर चिंचोळ्या आकारात वसली आहे. विस्ताराला जागा नाही आणि पर्यायी व्यवस्थाही नाही. अशा स्थितीत बाजारपेठेत भाजी व्यापारी आणि इतर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. भाजी गल्लीत तर न बोलण्यासारखी स्थिती आहे.
व्यापाऱ्यांचा माल घेऊन आलेला एखादा ट्रक बाजारात आला तर भाजी गल्लीतून एक माणुसही पलीकडे जाऊ शकत नाही अशी स्थिती होते. बाजारपेठेत वाहतूक कोंडी ठरलेली आहे. यामुळे अनेक माल वाहक ट्रक चालक बाजारपेठेत ट्रक घालत नाहीत. याचा फटका व्यापाऱ्यांना बसतो. अखेर यावर उपाय म्हणून संगमेश्वर व्यापारी संघटनेनेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन दिले. याची दखल घेत ग्रामपंचायतीने तत्काळ १ ऑगस्टला रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या सर्वांना नोटीस धाडत अतिक्रमण हटविण्यासाठी विनंती केली.
यानंतर आज पुन्हा स्मरणपत्र पाठवून येत्या दोन दिवसांत अतिक्रमण हटवा अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे. दुसरी नोटीस प्राप्त होताच संबंधित व्यापाऱ्यांमधे खळबळ उडाली आहे. ही कारवाई केवळ एका गल्लीत होणार नसून ती संपूर्ण बाजारपेठेत करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले.





























































