संगमेश्वरमधील साडवलीत मिळणार स्ट्रॉबेरी! शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंड हवेच्या ठिकाणी होणारी लालेलाल स्ट्रॉबेरी आता कोकणातील लाल मातीवरही दिसणार आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! या उक्तीनुसार संगमेश्वर, साडवली येथील एका युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीसारखा यशस्वी प्रयोग केला आहे. तेही दोन एकर शेतजमीन भाडे करारावर घेऊन…

साडवलीत राहणारे शैलेश भस्मे यांनी गेली तीन वर्षे शेतजमीन भाडेकराराने घेऊन आतापर्यंत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. यंदा याच दोन एकर जागेत भस्मे यांनी स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी होणारे स्ट्रॉबेरीचे पीक आता साडवलीतही तयार होणार आहे. यासाठी जिद्द व मेहनत सोबत घेऊन भस्मे यांनी ही लागवड केली आहे. गेली दोन ते तीन वर्षे ते या जागेत विविध पिके घेत आहेत. प्रथम त्यांनी पपईचे पिक घेतले. त्याचे त्यांनी स्वत: मार्केटींग केल्याने चांगले पैसे मिळाल्याचे ते सांगतात.

एका वर्षी सुमारे 70 टन कलिंगड पीक घेऊन त्यातून त्यांनी चांगला नफा मिळवला. ही पीके घेत असतानाच आंतर पीक म्हणून ते काकडी, मिरचीतून उत्पन्न मिळवतात. पडीक व ओसाड जमीन घेऊन शैलेश भस्मे या युवा शेतकऱ्याने मेहनत व योग्य नियोजन करुन शेती प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत.

20 ते 25 टन स्ट्रॉबेरी मिळेल

कलिंगड व पपई पिकानंतर आपण यंदा स्टॉबेरीकडे वळलो आहोत. या पिकाची संपूर्ण माहिती, फवारणीची पद्धत अभ्यासली आहे. दोन एकरमध्ये आपण 30 हजार रोपे लावली असून सुमारे 20 ते 25 टन स्ट्रॉॅबेरी मिळेल असा विश्वास शैलेश भस्मे यांनी व्यक्त केला आहे.