संगमेश्वर तालुक्यात पेरणीची लगभग सुरू

265

कोकणात मागील चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने संगमेश्वर तालुक्यातील माखजन खाडीभागात शेतकरी बांधवांची पेरणीची लगभग सुरू झाली आहे. गेले अनेक दिवसांपासून शेतकरी वर्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याच घरामध्ये बाहेर न पडता लॉकडाऊन झाला होता. अनेक मशागतीची कामे खोळंबली होती. मात्र पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्ग सुखावला असून त्याची पावले आपल्या शेताकडे वळू लागली आहेत .

उन्हाच्या तीव्रतेमुळे शेताला भेगा पडल्या होत्या. आता मात्र हलक्या सरीने शेतजमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यामुळे शेती पेरणी योग्य बनली आहे. कासे, असावे, पेढांबे, धामापूर, करजुवे, कळंबूशी, नारडुवे, सरंद, माखजन, आरवली आदी खाडीलगतच्या गावामधील शेतकरी पेरणीच्या कामामध्ये गुंतला आहे. अनेक वर्षे शेतीपासून दूर गेलेला चाकरमानी लॉकडावूनच्या कार्यकाळात गावी आला असंल्याने आजपर्यंत पडून राहिलेली शेती पुन्हा नव्याने बहरात येणार आहे.

किंबहुना भातशेतीचे उत्पादन वाढण्याचे चांगले संकेत आहेत. तीन महिन्यांच्या आर्थिक लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी भात बियाण्यांसह इतर शेती औजाराच्या वाढत्या किमतीला तोंड देताना त्याला कसरत करावी लागणार आहे. यातच रासायनिक खतांचा तुटवडा व लहरी मान्सून याचा मेळ झाल्यास शेतकर्‍याचे उत्पादन वाढणार आहे.

– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती गंभीर आहे. यासाठी शासनाने शेतकरी वर्गाला कमी किंमतीत भाताचे बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून दिल्यास शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीने शेतीकडे वळेल आणि आपली आर्थिक स्थिती पुन्हा उभी करेन – दीपक जाधव, आदर्श शेतकरी, सरंद

आपली प्रतिक्रिया द्या