सांगोला नगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

सांगोला येथील नगरपालिकेने अखेर अतिक्रमणांवर आज हातोडा उगारला आणि शहरातील प्रमुख रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतला. त्यानंतर त्या मोकळ्या रस्त्यावर नगरपालिकेने लागलीच खड्डे तयार करून वृक्षारोपण केले.

सांगोला नगरपालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर सूचनेद्वारे व ध्वनिक्षेपक फिरवून शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत आवाहन केले होते. परंतु अतिक्रमणधारकांनी बुधवार अखेर स्वतः होऊन ती न काढल्यामुळे गुरुवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात वंदे मातरम् चौकातून झाली. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी आपल्या टपऱया स्वतःहून काढण्यासाठी घाई केली.

वंदे मातरम् चौक, अहिल्यादेवी पुतळा परिसर, कचेरी परिसर, कचेरी रोड, जयभवानी चौक, शिवाजी चौक, स्टेशन रोड, महात्मा फुले चौक तसेच इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. चिंचोली रोडवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर नगरपालिकेने लागलीच जेसीबीच्या साह्याने खड्डे खणून तेथे वृक्षारोपणही केले. यापुढे अतिक्रमणे होऊ नये म्हणून कर्मचारी नेमून त्यांच्याकडून दर पंधरा दिवसाला पुन्हा अतिक्रमण होत आहेत का, ते पाहून लागलीच झालेली अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.