केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने मिरज रोडवरील भुयारी मार्गावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचून वाहतूककोंडी झाली. त्यामुळे हा भुयारी मार्ग ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती झाली आहे. या मार्गासाठी कोटय़वधी रुपये खर्च करूनही हा भुयारी मार्ग वाहनधारकांना व नागरिकांसाठी अडचणीचा ठरत आहे.
सांगोला शहरातील मिरज रोडवरील या दुहेरी भुयारी मार्गाची रुंदी प्रत्येकी फक्त 12 फूट असून, तीही वळणावर आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते. रस्त्याच्या नजीक गटार असल्याने ऐन उन्हाळ्यातही पाणी साचत होते. हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर गुरुवारी साडेचार वाजता प्रथमच फक्त अर्धा तास मोठा पाऊस झाला. या पावसाने भुयारी मार्गाच्या बाजूच्या संरक्षण भिंतीतून मोठय़ा प्रमाणात पाण्याचे फवारे निघाले व बघता बघता भुयारात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. तसेच, मध्यभागी गाळ साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अरुंद दुहेरी मार्गामुळे शालेय विद्यार्थी, नागरिकांना या मार्गातून जाताना मोठी कसरत करावी लागली. अल्प पावसाने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी साचत असेल तर मोठय़ा पावसाने या भुयारी मार्गाची काय अवस्था होईल, याबाबत नागरिकांतून चर्चा होत आहे.
हा भुयारी मार्ग सांगोला शहरातील सतत वर्दळीचा मार्ग आहे. फक्त 12 फूट रुंदीमुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते आहे. पायी जाणाऱया नागरिकांना, सायकलस्वारांना तर जीव मुठीत धरून जावे लागते. त्यात खोली जास्त असल्याने सखल भागातील गटारीचे पाणी भिंतीतून पाझरत आहे. मिरज रेल्वे फाटक ते महुद चौक बायपास रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे काम लवकर झाले, तर हा बायपास सोयीचा होणार असल्याचे मत वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.
दुष्काळी भागात धबधब्याचा ‘आनंद’
भुयारी मार्गाच्या भिंतींमधून पाणी येत असतानाच, वरच्या बाजूनेही धबधब्यासारखे पाणी पडत होते. अशा परिस्थितीतही दुचाकीस्वारांना या पाण्यातून ये-जा करावी लागत होती. त्यामुळे ‘दुष्काळी असणाऱया सांगोला तालुक्यात धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर या भुयारी मार्गाने प्रवास करा’, ‘काय पाऊस, काय पाणी अन् काय धबधबे’ अशा उपरोधिक प्रतिक्रिया सांगोला शहरातील नागरिकांमधून उमटत होत्या.
































































