
गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली ठाम आणि आक्रमक भूमिका आता पक्ष नेतृत्वाच्या रडारवर आली आहे. हिंदुत्ववादी भूमिका आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना बीडचा नियोजित दौरा रद्द करून तत्काळ मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.
जगताप यांच्या वक्तव्यांमुळे अजित पवार गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जगताप यांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही त्यांनी आपली भूमिका आक्रमक करत हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर उघडपणे बोलायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर आज बीड येथे नियोजित असलेला जगताप समर्थकांचा मोर्चा रद्द करण्यात आला असून, जगताप यांनी तातडीने मुंबई गाठावी, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.