सॅनिटायझर, मास्क व्यवसायात सव्वाकोटीचा गंडा, शाहुपुरी पोलिसांत चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, मास्क आदी साहित्य विक्रीच्या व्यवसायात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वा कोटीचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित हरीश नागदेव, राहुल हरीश नागदेव, हरीश बलीराम नागदेव (तिघे रा. महालक्ष्मी पार्क सोसायटी, हॉकी स्टेडियम परिसर) आणि श्याम पल्लोद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संतोष पोवार (रा. राजारामपुरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

जिलानी मुल्ला व समीर भालदार यांच्यासोबत फिर्यादी संतोष पोवार याचा मोटार खरेदी-विक्रीच्या व्यावसायिक भागीदारीत शाहूपुरी परिसरात व्यवसाय आहे. रोहित, राहुल, हरीश, नागदेव आणि श्याम पल्लोद हे मोटार खरेदी करण्यासाठी आले असता, या सर्वांची ओळख झाली. यावेळी कोरोना संकटात या व्यावसायिकांना आलेल्या मंदीचा अंदाज घेत, त्यांनी सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, मास्क, पीपीई किट, ऑक्सिमीटर, फेस शिल्ड आदी वस्तूंची ऑर्डर घेऊन त्याचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. या व्यवसायात मोठा नफा मिळवून देऊ, असे आमिषही दाखवले.

त्यामुळे पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला प्रत्येकी दीड लाखप्रमाणे साडेचार लाख रुपये दिले. त्याच पैशांतून व्यवसायात नफा झाल्याचे भासवून संशयितांनी त्यांना नफ्याचा काही परतावा दिला. विश्वास संपादन केल्यानंतर मोठी ऑर्डर मिळाल्याचे सांगून संशयितांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सांगितले. यातून वेळोवेळी एकूण 1 कोटी 5 लाख 15 हजार 500 रुपये घेतले. मात्र, व्यवसायात गुंतवलेली मुद्दल तसेच त्याचा नफा दिला नाही. हा प्रकार 3 मे 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 अखेर घडल्याची तक्रार पोवार यांनी दिली आहे. त्यानुसार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील तपास करीत आहेत.