
सामना प्रतिनिधी, मुंबई
महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे वाढत असल्याचे चित्र आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्यामुळे हे प्रकार घडत आहेत. खरे तर सर्वांनी स्वतः याबाबत गांभीर्याने विचार करून महिलांप्रति आपल्या संवेदना जागृत केल्या पाहिजेत. जेव्हा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा शुद्ध होईल तेव्हाच महिलांविरोधातील गुन्ह्यांना आपोआप आळा बसेल असे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आज येथे सांगितले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आज पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आयुक्तांनी विविध विषयांवर भाष्य केले. महिलांविरोधातील गुह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या विरोधातील गुन्हे घडू नयेत, महिलांसाठी हे शहर सुरक्षित sठेवणे आमच्यासाठी चॅलेंज आहे. ते चॅलेंज आम्ही स्वीकारले असून महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. आम्ही तर आहोतच पण समाजात महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यासाठी केवळ शाळा-कॉलेज किंवा अन्य मार्गानी समुपदेशन करणे चालणारे नाही, तर प्रत्येकाने स्वतः त्याचे गांभीर्य ओळखून महिलांप्रति अधिक संवेदनशील झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. शिवाय शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे पसरवले आहे. येत्या सहा महिन्यांत आणखी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही गुन्हा करण्याचे धाडस करणार नाही आणि कुणी प्रयत्न केलाच तर त्याला तेथेच अटकाव करता येईल. हे शहर सर्वांचे आहे. त्यामुळे आपले शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असेही बर्वे म्हणाले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, उपाध्यक्ष सुधाकर कश्यप आणि ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य उपस्थित होते.
…तर अशा धमक्यांना भीक घालू नका!
अलीकडच्या काळात पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. बऱयाचदा समोरची व्यक्ती पोलिसांना धमकावते. तुमचे व्हिडीओ व्हायरल करू, मीडियामध्ये तुमच्या बातम्या छापून आणू, तुमची वर्दी उरवतो अशा धमक्याच पोलिसांना खुलेआम दिल्या जातात. पण मी आमच्या कर्मचाऱयांना सांगितले आहे, जर आपण चुकीचे काही केलेले नसेल तर अशा धमक्यांना काडीची भीक घालू नका. अशा धमक्यांना न घाबरता योग्य ती कारवाई जरूर करा, तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही अशा सूचना पोलिसांना दिल्याचे बर्वे यांनी पोलिसांवरील हल्ल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

























































