संजय दत्तने जिंकली कर्करोगाविरुद्धची लढाई, सोशल मीडियातून दिली माहिती

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. संजूबाबाने अखेर कर्करोगाविरूद्धची लढाई जिंकली असून त्यानेच आज सोशल मिडियावरून ही माहिती दिली आहे. मुलांच्या वाढदिवशीच मी या लढाईतून विजयी झाल्याने मला खूप आनंद होत आहे असे म्हणत आपल्या चाहत्यांचे आणि कोकीलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांच्या टिमचे आभार मानले आहेत.

दोनच महिन्यांपूर्वी संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर मुंबईतच उपचार घेण्याचा आणि कामातून काहीकाळ ब्रेक घेण्याचा निर्णय त्याने घेतला होता. अखेर त्याने आता कर्करोगावर मात केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात संजय दत्त म्हणाला, ‘गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी खूप कठीण होते. परंतु म्हणतात ना देव जास्त संकटे ही सर्वात शक्तिशाली शिपायांच्याच वाटय़ाला देतो. आज माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मी या लढाईतून विजयी झाल्याने मला आनंद झाला आहे. त्यांना आरोग्य आणि त्यांची योग्य देखरेख हे बेस्ट गिफ्ट देण्यासाठी मी सक्षम आहे. हे तुमच्या पाठिंब्याशिवाय शक्य झाले नसते.’

पुढे तो म्हणाला, ‘संकटकाळात माझ्या पाठीशी उभे राहिलेले माझे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांचा मी आभारी आहे. खासकरून ज्यांनी गेल्या काही आठवडय़ात माझी खूप काळजी घेतली त्या कोकिलाबेन रुग्णालयातील डॉ. सेवंती आणि त्यांच्या टीमला खूप सारे धन्यवाद.’ संजय दत्तच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे तर नुकतेच त्याने ’समशेरा’ चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले आहे. नोव्हेंबरपासून तो ’केजीएफ 2’ च्या शूटिंगला सुरूवात करणार असून यात तो व्हिलनची भूमिका साकरतोय.

आपली प्रतिक्रिया द्या