
अभिनेता संजय दत्त सध्या केजीएफ चॅप्टर 2च्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे. जवळपास चाळीस वर्षं मनोरंजन सृष्टीचा भाग असलेल्या संजयने आयुष्यातील काही खळबळजनक गोष्टींचा खुलासा केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत संजयने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी उघड केल्या. त्यात अंमली पदार्थांचं व्यसन, वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष ते कर्करोगाशी लढा अशा अनेक घटना त्याने या मुलाखतीत उलगडल्या. विशेषतः त्याने त्याच्या व्यसनाच्या विळख्यातील काळाबाबत उलगडून सांगितलं.
तो म्हणाला की, मी खूप बुजरा होतो. विशेषतः मुलींच्या बाबतीत. त्यामुळे मी कूल दिसायचा प्रयत्न करायचो. तुम्ही अंमली पदार्थ घेता आणि मग महिलांसमोर कूल बनून फिरता. तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारता. माझ्या आयुष्यातली 10 वर्षं एकतर बाथरूम नाहीतर माझी खोली यातच गेलं आहे. मला शूटिंग अजिबात आवडायचं नाही. पण, त्यावेळी आयुष्य असं होतं आणि नंतर ते बदललं, असं संजय म्हणाला.
मी या व्यसनामुळे रिहॅब सेंटरला राहिलो. जेव्हा तिथून परतलो तेव्हा लोक मला चरसी अशी हाक मारायचे. तेव्हा मी माझ्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला लागलो. मी व्यायाम सुरू केला. मग मी चरसीपासून एक असा माणूस बनलो, ज्याच्या पिळदार शरीराचं लोक कौतुक करायचे. मला जेव्हा कर्करोगाचं निदान झालं, तेव्हा मी तासन्तास रडलेलो आहे. आधी डॉक्टरांना मला टीबी असावा अशी शंका होती. पण जेव्हा माझ्या फुफ्फुसांतील पाण्याचा अहवाल आला तेव्हा तो कर्करोग असल्याचं निदान झालं. माझ्या केमोनंतर मी रोज सायकल चालवायचो, दोन ते तीन तास बॅडमिंटन खेळायचो, असा अनुभवही संजयने या मुलाखतीत शेअर केला आहे.




























































