
कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या, निवडणुकांसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. अद्याप निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी स्थानिक पातळीवर धुरळा उडायला सुरुवात झाला आहे. अशातच मिंधे गटाचे वाचाळवीर आमदार संजय गायकवाड यांनी या निवडणुकीत होणाऱ्या खर्चाबाबत विधान केले आहे. पालिका निवडणूक सोपी राहिली नसून या निवडणुकीत होणाऱ्या खर्चामुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो, असे गायकवाड म्हणाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुका आता सोप्या राहिलेल्या नाहीत. एक-दोन ते तीन कोटी रुपये खर्च करावे लागतात. काही ठिकाणई जेवणावळीसाठी 100-100 बोकडं कापावी लागतात. या खर्चामुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो.
पोटातलं ओठावर आले – वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. खोक्यांची आणि बोके (बोकड) यांची सवल लागलेल्यांच्या तोंडून दुसरे काय निघणार आहे. त्यांच्या पोटातलं ओठावर आले. संजय गायकवाड कधीकधी सत्य बोलतो. त्यामुळे तीन कोटी रुपये आणि 100 बोकडं… आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवले, किती कोटी जमा केले, किती कोटी वाटणार आहे, यावर निवडणूक आयुक्तांना लक्ष ठेवावे लागेल. नेमकं तीन कोटी देतो की पाच कोटी, 100 बोकडं देतो की 200 बोकडं, असे वडेट्टीवार म्हणाले.
आमदार नसताना मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मिंधे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा दावा