क्रिकेटनामा – धन-दौलत-इज्जत-अबू सगळं गेलं!

>> संजय कऱ्हाडे

प्रथम टाचेखाली घ्या, मग चिरडा! रवी शास्त्राrने घालून दिलेला नियम आज दक्षिण आफ्रिकेचा कप्तान टेम्बा बवुमाने तंतोतंत अंमलात आणला! हिंदुस्थानचा पहिला डाव केवळ 201 धावांवर गुंडाळल्यानंतर तब्बल 288 धावांची आघाडी मिळाल्यावर फॉलो-ऑन न देता त्याने पुन्हा फलंदाजी करायचं ठरवलं! आता तो आफ्रिकेला दुसऱया डावात अजेय अशी आघाडी मिळाल्यावरही डाव घोषित न करता आपल्याला चिरडत, चिडवत राहील. त्याचा हक्कच आहे!

हुशार अन् चलाख व्यवस्थापन असताना चपखल संघ निवड करून, योग्य खेळाडूंना उचित संधी आणि प्रोत्साहन देऊन जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व निर्माण केल्यावर आपणही प्रतिस्पर्धी संघांना असंच वागवलं होतं. आता अजाण, असमंजस, जिद्दी, अहंकारी आणि पोरकट व्यवस्थापनाच्या हाती कारभार गेल्यानंतर आपल्याला गवऱया वेचाव्याच लागणार!

राहुल, यशस्वी, साई, जुरेल अन् जाडेजा काढा-बदला-फेकाच्या दडपणाखाली द्विधा मनःस्थितीत सापडून बाद होताना दिसले. कप्तान ऋषभ पंत बाद झाला तो ‘एकच फटकार अन् चारशे पार’च्या नादात! जणू त्याला त्याच्या उरावरचं ओझं सीमारेषेबाहेर फेपून द्यायचं असावं! खरंतर सामना वाचवणाऱया अन् जिंपून देणाऱया खेळी करताना आपण त्याला बऱयाचदा पाहिलेलं आहे.

नितीश पुमार तेवढा अप्रतिम बाऊन्सरवर बाद झाला. यांन्सनचा तो आखूड टप्प्याच्या चेंडू नितीशच्या नरडीचा नेम धरून उसळला आणि बॅटच्या खांद्याला लागून गलीच्या दिशेन उडाला. मार्व्रमने दुसऱया स्लिपमधून लांब झेपावत तो झेल घेतला. त्याच्या हातात झेल विसावला तेंव्हा मार्परम दोन फूट हवेत होता! मार्परमने पाच झेल घेतले. तसंच यांन्सनने सहा बळी घेतले, 93 धावा केल्या अन् यशस्वीचा अप्रतिम झेलही घेतला; खराखुरा सामनावीरच तो!

एक खेळाडू मात्र वारंवार व्यवस्थापनाच्या कानाखाली कढत गुळाची पोळी उमटवताना दिसतोय. त्याला तुम्ही अष्टपैलू म्हणून वागवा, वागवू नका. गोलंदाजी द्या, देऊ नका. त्याला फलंदाजीसाठी पुठल्याही क्रमांकावर पाठवा. दिलेली जबाबदारी तो जी-जान एक करून प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करतो. वॉशिंग्टन सुंदर! हौद से गई हुई बूंद बूंद से लाने की कोशिश आज त्यानेच केली!

 तिसऱया दिवशीही खेळपट्टी काही खोकली-खाकरली नाही. चेंडूला मिळणारी उसळी समान होती, फिरतसुद्धा संथच होती. मात्र आफ्रिकन फिरकी गोलंदाजांनी त्यांचं काwशल्य, कसब पणाला लावलेलं दिसलं. चेंडूला उंची देणं, टप्पा मागे-पुढे करणं, कमी वेगाने गोलंदाजी करणं अशा अनेक क्लृप्त्या त्यांनी वापरल्या.

आता अशाच काही खुब्या, हिकमती आपल्या गोलंदाजांनी दुसऱया डावात वापरल्या, चतुराईने गोलंदाजी करून आफ्रिकेला दोन आकडी बासनात गुंडाळालं तर सामन्यात रंग भरू शकतो. पण वेडं मन, करी वेडय़ा कल्पना! तरीही पुन्हा जवळपास चारशे धावा कराव्या लागतीलच…

व्यवस्थापन बदलल्यावर कमालच झालिये. हल्ली चांगल्या, फिरकीला साथ देणाऱया किंवा परदेशी पुठल्याच खेळपट्टीवर आपल्याला खेळता येईनासं झालंय! प्रसिद्ध अन्  प्रचलित उद्गाराप्रमाणे संघाने धन-दौलत-इज्जत-अब्रू सगळं घालवलंय. अर्थात त्याचं योग्य श्रेय संघ व्यवस्थापनाला द्यावंच लागेल!