
>> संजय कऱ्हाडे
कोलकाता कसोटी लाजिरवाण्या पद्धतीने हरल्यानंतर गुवाहाटीची खेळपट्टी चित्रपटाची नायिका झाली होती! चर्चा फक्त तिचीच झाली. अन् तीसुद्धा सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत तशीच ठाकली. चिरतरुण! हिंदुस्थानी फलंदाजांसमोर मात्र तिने आपले नखरे दाखवले, नापं मुरडली. आपले फलंदाज काही तिला पटवू शकले नाहीत! ना पहिल्या डावात, ना दुसऱया डावात. दुसऱया डावात आतापर्यंत दोनच गडी बाद झालेत, पण बाकीचेही आज होतीलच! पाचशे एकवीस धावा फटकावण्याचं आव्हान पेलणं तर असंभव आहे अन् दिवसभर खेळपट्टीवर उभं राहून तिच्या नाकदुऱया काढणं म्हणजे तिला लग्नाच्या मंडपातून पळवण्याएवढं दुष्कर!
यशस्वी आणि राहुल मान खाली घालून फलंदाजी करण्याऐवजी मान खाली घालून परतलेत. बाकीच्यांकडून काय अपेक्षा!
आफ्रिकेच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी हा सामना गाजवला. पहिल्या डावात मुथुसामी आणि यान्सन या दोघांनी अन् दुसऱया डावात रिकल्टन आणि स्टब्सने. त्यांच्यावर जशी खेळपट्टी खूश होती तशीच ती मेहेरबान होती यान्सन आणि हार्मर या गोलंदाजांवर. पहिल्याचा वेग झोपला नाही अन् दुसऱयाचं कौशल्य. हार्मरचा ऑफ स्पिन तर एरापल्ली प्रसन्नालाही खूश करून गेला असेल! हार्मरने चेंडूला दिलेली उंची, मागेपुढे केलेला टप्पा आणि कमीजास्त केलेला चेंडूचा वेग वाखाणण्यासारखा आहे. आज शेवटच्या दिवशी तो पुन्हा एकदा आपल्या फलंदाजांना उल्लू बनवेल अशी मला खात्री आहे. राहुलला त्याने कसं चकवलं हे तर आपण पाहिलंच! जाता-जाता यशस्वीला सांगावंसं वाटतं की, अंगावर येणाऱया म्हशीचा अन् शरीराजवळ आलेल्या चेंडूचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नये!
अपेक्षेप्रमाणे आफ्रिकेच्या कप्तानाने पार तिसऱया सत्रापर्यंत आणि आपल्या खेळाडूंचे खांदे पडेपर्यंत मैदानावर रखडवलं. अन् अखेर यशस्वीच्या हाती चेंडू द्यावा लागेपर्यंत पिडलं.
कधी वाटलं, बव्हुमाला ‘बौना’ म्हटल्याचा राग, वचपा तो काढत असावा! ओघाने आलं म्हणून, पहिल्या कसोटीत बुमराचा तो चेंडू बव्हुमाच्या पॅडवर लागल्यानंतर पायचीतसाठी डी.आर.एस. घ्यायचा की नाही यावर ऋषभ आणि बुमराचं एकमत होत नव्हतं. ऋषभच्या मते चेंडू बव्हुमाच्या गुडघ्याच्या वर लागला होता आणि चेंडू स्टम्पवरून गेला असता. तेव्हा बुमरा म्हणाला की, बव्हुमा ‘बौना’ म्हणजे बुटका असल्याने चेंडू स्टंपला लागला असता. गंमत अशी की, इंग्रजी भाषेत ‘बौना’ म्हणजे द्वार्फ आणि तो एक अपमानास्पद शब्द मानला जातो!
असो. बव्हुमाला बुमराने नेमपं काय स्पष्टीकरण दिलं हे तर आपल्याला ठाऊक नाही; पण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत आपल्या क्रिकेटची उंची कमी झाली एवढं मात्र नक्की!



























































