निसर्गजागर – आधुनिक तंत्रज्ञानाने व्याघ्र संवर्धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय करकरे
[email protected]

येत्या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने भारतातील वाघांच्या वाढत्या संख्येचा आढावा घेताना त्यासोबतच नव्याने निर्माण होणाऱया आव्हानांचाही विचार व्हायला हवा. व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेरील जंगलात मोठय़ा प्रमाणावर वाघ राहू लागल्याने मानव-वन्यजीव संघर्ष, अधिवास, विकासकामे ही आव्हाने वाढत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी विज्ञानाधारित व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर अपरिहार्य ठरणार आहे.

भारतातील व्याघ्र संवर्धनाचा इतिहास हा केवळ जंगलातील एका प्राण्याच्या संरक्षणाचा इतिहास नाही, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि संवेदनशील व्यवस्थापन यांच्या यशस्वी संगमाची कहाणी आहे. काही दशकांपूर्वी वनरक्षकांना वाघाचा मागोवा घेण्यासाठी जंगलातील पायाचे ठसे, विष्ठा, झाडांवरील ओरखडे किंवा स्थानिक माहिती यांवर अवलंबून राहावे लागत होते. आज मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता, कॅमेरा ट्रप, उपग्रह तंत्रज्ञान, डीएनए विश्लेषण, मोबाईल अॅप्स आणि डिजिटल डेटाबेस यांच्या मदतीने वाघांच्या हालचालींचे रिअल-टाइम निरीक्षण करणे शक्य झाले आहे.

2005 साली राजस्थानातील सरिस्का व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ शिल्लक नसल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्यावेळी अधिकृत नोंदींमध्ये तेथे वाघ अस्तित्वात असल्याचे दाखवले जात होते. पंजाच्या सहाय्याने ही गणना केली जात होती. या घटनेने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आणि वाघांची गणना करण्याच्या जुन्या पद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. यानंतर भारताने व्याघ्र संवर्धनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला. गणनेची ही पद्धत बंद झाली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे वाघांच्या गणनेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. आज वाघांची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वात विश्वासार्ह पद्धत म्हणजे कॅमेरा ट्रप. जंगलातील पायवाटा आणि प्राण्यांच्या नियमित वापरातील मार्गांवर कोणतीही हालचाल टिपणारे (मोशन सेन्सरयुक्त) कॅमेऱयांच्या जोडय़ा बसवल्या जातात. कोणताही प्राणी समोरून गेला की हे कॅमेरे त्याचे छायाचित्र आपोआप टिपतात. वाघाच्या शरीरावरील काळ्या पट्टय़ांची रचना प्रत्येक वाघात वेगवेगळी असते. माणसाच्या बोटांच्या ठशांप्रमाणे ही नैसर्गिक ओळख असल्यामुळे प्रत्येक वाघ स्वतंत्रपणे ओळखता येतो. त्यामुळे केवळ वाघांची संख्या नव्हे, तर त्यांचे वय, लिंग, प्रजनन आणि स्थलांतर यांचाही अभ्यास शक्य होतो.

आज भारतात दर चार वर्षांनी होणारी अखिल भारतीय व्याघ्र गणना ही जगातील सर्वात मोठी वन्यजीव सर्वेक्षण मोहीम मानली जाते. लाखो किलोमीटर पायी चालून वनकर्मचारी जंगलातील माहिती गोळा करतात. लाखो निरीक्षणे, लाखो छायाचित्रे आणि हजारो कॅमेरा ट्रप यांच्या आधारे वाघांची संख्या निश्चित केली जाते. या अभूतपूर्व वैज्ञानिक उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. केवळ छायाचित्रे घेणे पुरेसे नसते. देशभरातील हजारो वाघांचे फोटो संगणकीय सॉफ्टवेअरद्वारे तपासले जातात. प्रत्येक वाघाच्या पट्टय़ांची तुलना करून त्याला एक स्वतंत्र क्रमांक दिला जातो. त्यामुळे एखादा वाघ दुसऱया जंगलात गेला, नवीन क्षेत्रात स्थायिक झाला किंवा त्याची पुन्हा नोंद झाली तरी त्याची ओळख लगेच पटते. देशातील हजारो वाघांचा डिजिटल डेटाबेस आज एनटीसीएकडे उपलब्ध असून प्रत्येक वाघाची जणू स्वतंत्र डिजिटल ओळख तयार झाली आहे.

वाघांची संख्या मोजण्याइतकेच त्यांचे दैनंदिन संरक्षणही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिह्यात याचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेरील जंगलात मोबाईल नेटवर्कशी जोडलेले स्मार्ट कॅमेरा ट्रप बसविण्यात आले आहेत. वाघाचा फोटो काढला गेला की काही सेकंदांत तो संबंधित वनअधिकाऱयांच्या मोबाईलवर पोहोचतो. यामुळे वाघ गावाजवळ आल्यास गावकऱयांना तातडीने इशारा देता येतो आणि मानव-वाघ संघर्ष टाळण्यास मोठी मदत होते.

सर्वच जंगलांमध्ये कॅमेरा ट्रप बसविणे शक्य नसते. आज उपग्रह तंत्रज्ञानही व्याघ्र संवर्धनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. विशिष्ट परिस्थितीत काही वाघांना रेडिओ किंवा जीपीएस सॅटेलाइट कॉलर लावण्यात येतात. यामुळे त्यांच्या हालचाली, भ्रमणमार्ग, अधिवासाचा वापर आणि मानवी वस्तीजवळील वावर यांची अचूक माहिती मिळते. नवीन अधिवासात स्थलांतर केलेल्या वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा संवर्धन पुनर्वसनाच्या वेळी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. तंत्रज्ञानामुळे शिकारीविरोधी कारवाईलाही बळ मिळाले आहे. अनेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये ड्रोन, सीसीटीव्ही नेटवर्क, जीपीएस गस्त, डिजिटल नियंत्रण कक्ष आणि ऑनलाइन मॉनिटरिंगचा वापर वाढत आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर तातडीने कारवाई करता येते. वनकर्मचाऱयांच्या सुरक्षिततेतही यामुळे वाढ झाली आहे.

तथापि, केवळ तंत्रज्ञानानेच वाघांचे संरक्षण होणार नाही. तंत्रज्ञान हे एक प्रभावी साधन आहे; अंतिम उद्दिष्ट नाही. वाघ टिकण्यासाठी त्याचा अधिवास, पुरेसा भक्ष्यसाठा, जंगलांची सलगता, सुरक्षित वन्यजीव मार्ग, स्थानिक समाजाचा सहभाग आणि सक्षम वनव्यवस्थापन तितकेच आवश्यक आहे. संगणक किंवा कॅमेरे जंगलाचे रक्षण करू शकत नाहीत; ते वनरक्षक व संशोधक यांच्या कामांना अधिक मजबूत बनवतात. पायी गस्त हे सर्वात महत्वाचे आहे, त्याला तंत्रज्ञ जोड मिळाली की ते अधिक प्रभावी ठरते.

भारतातील व्याघ्र संवर्धनाचा प्रवास हा विज्ञान आणि निसर्ग यांचा उत्तम समन्वय आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज वाघ केवळ मोजले जात नाहीत, तर त्यांचे जीवन, स्थलांतर, प्रजनन, आरोग्य आणि संरक्षण यांचा सूक्ष्म अभ्यास शक्य झाला आहे. हीच वैज्ञानिक वाटचाल पुकाळात भारतातील वाघ आणि त्यांची जंगले सुरक्षित ठेवण्याची सर्वात मोठी आशा आहे.
(लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.)