
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात भाजप आणि शिंदे गटामध्ये युती झाली खरी. मात्र जागावाटपात अपेक्षित जागा मिळालेल्या नसल्याने मी समाधानी नाही.. खूप दुःख आणि वेदना होत असल्याचे सांगत भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख आणि आमदार संजय केळकर यांनी खंत व्यक्त केली. निवडणूक अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली असताना केळकर स्पष्टच बोलल्याने केळकर हे एकप्रकारे शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणून सत्ताधारी शिंदे गटावर निशाणा साधणारे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात झालेल्या युतीसंदर्भात समाधानी नसल्याचे सांगितले. अनेकवेळा बैठकीचे खलबते झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप 40 तर शिंदे गट 87 असे जागावाटप झाले. मात्र जागावाटपात भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, त्याबाबत खूप वेदना झाल्या असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. तसेच युती झाली नसती तर नक्कीच भाजपच्या प्रचंड जागा निवडून आल्या असत्या, असे सांगत केळकर युतीसाठी आग्रही नसल्याची चर्चा सुरू आहे.
131 उमेदवारांची तयारी होती
ज्या प्रभागात लोकांचे पूर्ण समर्थन आहो त्या प्रभागात एकही जागा मिळाली नाही. 131 प्रभागांत उमेदवार देता येतील एवढी तयारी आमची झाली होती. पण अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची समजूत काढली जात आहे असे केळकर यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात 131 जागांसाठी 1 हजार 128 उमेदवारी अर्ज
आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली होती. ठाणे पालिकेच्या 131 जागांसाठी तब्बल 1 हजार 128 उमेदवारांनी आपले अर्ज भरले. आज या सर्व अर्जाची छाननी सुरू असून यामधून किती उमेदवारांचे अर्ज बाद होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2017 प्रमाणेच यंदाही 33 प्रभागच असणार आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचा तर एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे. तब्बल 8 वर्षांनंतर पालिका निवडणुका होत असल्याने सर्व प्रभागांत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यानुसार ठाणे पालिकेच्या एकूण 131 जागांसाठी 1 हजार 128 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.





























































