
>> संजय कुळकर्णी
ऑर्केस्ट्रा आजही कमी–अधिक प्रमाणात होत असतात. एखाद्या दिवंगत संगीतकार, गायक यांच्यावर ऑर्केस्ट्रा होताना दिसतात, पण प्रामुख्याने उल्लेख करायचा तर रफींच्या कार्यक्रमाचा. हिंदी चित्रपटसृष्टीत मोहम्मद रफींचे मोठे योगदान आहे. सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली असल्याने संगीतप्रेमींच्या हृदयात रफींचे नाव कोरले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या गाण्यांचा ऑर्केस्ट्रा असला की रसिकांची हमखास दाद येते आणि माहोल बदलून जातो. रफींचे जादुई स्वर आणि ऑर्केस्ट्रा हे समीकरण सदाबहार आहे हेच खरे.
एक काळ असा होता की ऑर्केस्ट्रांनी रसिक मनावर अजब जादू केली होती. ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात होताना दिसायचे. त्याला प्रचंड मागणी असायची. आज लिहीत असताना सहजच ‘झंकार ऑर्केस्ट्रा’च्या गाण्याचे स्वर आठवू लागले. विनोद गीध यांच्या ‘झंकार’ हा ऑर्केस्ट्रा लिहिताना ध्यानात आला. गिरगावातील विनोद गीध यांना संगीताची अतिशय आवड होती. ते वाद्येदेखील उत्तम वाजवीत. वाद्यांचे ज्ञान असले की, साहजिकच ऑर्केस्ट्राची निर्मिती करण्याची खुमखुमी काहींना असते. सर्वांना ते जमतं असे नाही, पण गिरगावातल्या विनोद गीध यांना ते जमले. त्यांनी ‘गीध झंकार’ हा स्वतचा ऑर्केस्ट्रा काढून चांगलीच धूम माजवली. ज्येष्ठ संगीतकार जयकिशन जो अकॉर्डियन वाजवत त्याच प्रकारचा अकॉर्डियन विनोद गीध स्वत वाजवत. त्यांची त्या वाद्यावर हुकमत होती. अनेक तरुणांना त्यांनी आपल्या वाद्यवृंदात सामावून घेतले होते. ऑर्केस्ट्रा क्षेत्रात त्यांच्या ‘झंकार’ला नाव मिळाले. नंतर आधुनिक वाद्यात तो मागे पडत गेला. पण ‘झंकार’चे प्रयोग होत राहिले आणि प्रेक्षकांचा प्रतिसादसुद्धा मिळत गेला.
अजून तसाच एक ऑर्केस्ट्रा ‘दीदारसिंग आणि पार्टी.’ दीदारसिंग यांनी याचे अनेक प्रयोग केले. त्यालाही लोकप्रियता लाभली. गणेशोत्सवात अशा ऑर्केस्ट्राची नेहमी चढाओढ असायची, पण कालांतराने मात्र ती कमी होत गेली.
ऑर्केस्ट्रा आजही कमी-अधिक प्रमाणात होतात. एखाद्या दिवंगत संगीतकार, गायक यांच्यावर ऑर्केस्ट्रा होताना दिसतात, पण प्रामुख्याने उल्लेख करायचा तर रफींच्या कार्यक्रमाचा. 31 जुलै हा रफींच्या पुण्यतिथीचा दिवस. ऑर्केस्ट्रावाले दरवर्षी हा दिवस साजरा करताना दिसतात. दरवर्षी त्यानिमित्ताने अनेक नव्या ऑर्केस्ट्राची निर्मिती होते, पण त्यांचे वास्तव्य फक्त पावसाळय़ात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे असते. रफी यांच्या गाण्याचे रसिकांच्या मनावर एक गारुड होते व आजही आहे. त्यांची सर्वच गाणी श्रवणीय तर होतीच, पण त्याहीपेक्षा ती ऐकताना त्या-त्या चित्रपटातील नायक डोळय़ांपुढे येत असत. ती गाणी प्रत्यक्ष रंगमंचावर ऐकताना अवर्णनीय आनंद मिळायचा. यातील उडत्या गाण्यांत शम्मी कपूर आणि गंभीर गाण्यांमध्ये राजेंद्रकुमार डोळय़ांसमोर यायचे. त्यांच्या गाण्यांची एक नेहमी खासियत असायची. ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी रफी साहेबांना मराठी गाणी म्हणण्यासाठी आमंत्रित केले. रफीजींनीही केवळ श्रीकांतजींमुळे होकार दिला. श्रीकांतजी यांनी संगीत दिलेली आणि रफी साहेबांनी म्हटलेली गाणी अजरामर झाली. आजचे तरुणसुद्धा ब्ल्यूटय़ूथवर ऐकताना दिसतात. रफी फक्त श्रीकांतजींकडेच गायले. श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतावर रफी साहेब फिदा होते.
रफींवर अनेक कार्यक्रम आले, त्यातला अशोक खरे यांचा कार्यक्रम रसिक विसरूच शकणार नाहीत. अशोक खरे हे व्हीजेटीआय महाविद्यालयात प्राध्यापक होते. रफी हे त्यांचे आवडते गायक. अशोक खरे यांचा आवाज रफी यांच्या जवळपास जाणारा असाच होता. म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमात ते गाताना रफीसाहेबच गात असल्याचा भास होत असे. शिवाजी मंदिर नाटय़गृहाची 31 जुलै ही तारीख अशोक खरे यांच्या त्या कार्यक्रमासाठी दरवर्षी आरक्षित असायची. त्यात कधीही खंड पडलेला नव्हता. विशेष म्हणजे बुकिंग सुरू झाले की, दोन तासांत प्रयोग हाऊसफुल्ल होत असे. हे अनेक वर्षे मी अनुभवलेय. त्या कार्यक्रमातील वादक खास नसायचे तरीही रसिक फक्त अशोक खरे यांच्या आवाजात रफी आहे म्हणून यायचे आणि ती गाणी ऐकून तृप्त व्हायचे.
श्रीकांत नारायण या गायकाचा आवाजदेखील रफी साहेबांच्या जवळपास जाणारा किंबहुना अगदी तसाच असल्याने त्यांना मागणी जास्त असायची. आजही या घडीला ते ‘जीवनगाणी’ या संस्थेबरोबर रफींचे कार्यक्रम सादर करताना दिसतात. ते आणि प्रसाद महाडकर यांनी याचे अनेक शो केले व करत आहेत. ‘जीवनगाणी’ यांचा ‘फिर रफी’ हा कार्यक्रम म्हणा, ऑर्केस्ट्रा म्हणा रफी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आचार्य अत्रे नाटय़गृहात प्रथमच सादर झाला. यानिमित्त अशा अनेक कार्यक्रमाचे जुलै महिन्यात सादरीकरण झाले आणि रसिकांनीही उदंड प्रतिसाद दिला.
आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे त्यांची पुण्यतिथी साजरी करताना
बरेच ऑर्केस्ट्रावाले दिसले. प्रसाद महाडकर हा सर्वांच्या आघाडीवर होता. त्याचे रफी साहेबांवर जास्त प्रेम आहे. ‘जीवनगाणी’ ही त्याची संस्था त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्या दिवशी प्रयोग करीत आली आहे. त्यांनी प्रबोधन, दीनानाथ आणि आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘फिर रफी’ हे तीन प्रयोग करून रसिकांना त्यात सामावून घेतले. ‘फिर रफी’ प्रयोगाचे हे 20वे वर्ष आहे. रसिकांनी त्या प्रयोगाला हाऊस फ़ुल्ल प्रतिसाद दिला. श्रीकांत नारायण यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला रसिकांची दाद मिळताना पाहून मन हेलावून गेले. ती गाणी सगळे रसिक गुणगुणताना दिसले. हीच तर त्या महान गायकाची कमाल होती. दिगंबर प्रभू यांच्या रंगाई संस्थेने गडकरी रंगायतनमध्ये रफीचा एक प्रयोग केला. महाराष्ट्रातून अनेक प्रयोग झाले. कौतुकाची गोष्ट म्हणजे ऑर्केस्ट्रा मंडळींनी अजूनही ऑर्केस्ट्रा जिवंत ठेवला आहे. अशा विविध कार्पामांमुळे ऑर्केस्ट्रा तेजाळून उठतो आणि कायम स्मरणात राहतो. हे सर्व पाहता रफी साहेबांचा जादुई स्वर कालातीत आहे एवढे मात्र निश्चित.
sanjaykul13@gmail.com






























































