केंद्रीय नेतृत्वासमोरच काँग्रेसमध्ये दुफळी, जाहीरनामा सादरीकरणाला संजय निरुपम गैरहजर

44

सामना प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर आज मुंबई काँग्रेसमधील दुफळी पुन्हा एकदा दिसून आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहिरनामा मुंबईकरांसाठी सादर केला. मुंबईतील काँग्रेसचे सर्व नेते व उमेदवार यावेळी उपस्थित होते. मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केलेले उत्तर -पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय निरुपम गैरहजर राहिले. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय निरुपम यांच्या या गैरहजेरीची काँग्रेस श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रकाशित केला. हाच जाहीरनामा मुंबईकरांसमोर सादर करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष व दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांनी वरळीत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांना आमंत्रित केले होते. केंद्रीय नेतृत्व मुंबईत असल्यामुळे स्वतः मिलिंद देवरा, प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, एकनाथ गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवारासंह महाआघाडीचे संजय दिना पाटील यांनी निवडणूक प्रचार बाजूला ठेवून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली त्याशिवाय भालचंद्र मुणगेकर, पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, कृपाशंकर सिंह, नसीम खान असे मुंबईतील काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते, पण नाराज संजय निरुपम या कार्यक्रमापासून लांब राहत उघडपणे नाराजी व्यक्त केली.

अध्यक्षपदावरून दूर केल्याची खदखद
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दूर केल्याची खदखद अजूनही निरुपम यांच्या मनात आहे. ही नाराजी उघडपणे व्यक्त करण्यासाठी ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, अशी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा होती. मुंबई अध्यक्षपदावर देवरा यांची नियुक्ती झाल्यावर निरुपम यांनी देवरा यांची भेट घेऊन अभिनंदनही केले होते. हा वाद मिटल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते, पण या सोहळय़ाला अनुपस्थिती लावून निरुपम यांनी दुहीचे जाहीर दर्शन केले. नेमकी हीच गोष्ट निरुपमविरोधी गटाने हेरली आणि आनंद शर्मा यांच्या नजरेस निरुपम यांची अनुपस्थिती दाखवून दिली. पक्षश्रेष्ठींनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या