परीक्षण – मानवी मूल्यांचा वैश्विक विचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय पवार

‘निसर्गनीती’ हे राजश्री कुलकर्णी यांनी लिहिलेले प्रयोगशील पुस्तक. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेने प्रतिज्ञा दिलेली आहे. या प्रतिज्ञेमध्ये भारत देशालाच नव्हे, तर संपूर्ण विश्वाला स्वच्छ, सुंदर व रसायनमुक्त करण्याची प्रतिज्ञा आहे. लेखिकेची ही कृती वैश्विक पर्यावरणाचा विचार मांडणारी, मानवी मूल्य जपणारी आहे. या प्रतिज्ञेतून प्रत्येक व्यक्तीचे कृत्य हे वैश्विक कृत्य असल्याची जाण त्यांनी व्यक्त केलेली आहे.

सध्या वैश्विक स्तरावर पर्यावरण दिनाचे मोठय़ा दिमाखदार पद्धतीने आयोजन केले जाते. मात्र हा दिवस सोडला तर इतर दिवशी प्रत्येक व्यक्ती पर्यावरणाशी दोन हात दूर जाताना दिसतो. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच डॉ. किरण कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना ही सार्वत्रिक विचार मांडणारी आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रदूषण व रसायनमुक्त जीवन पद्धती स्वीकारणे कसे गरजेचे आहे ते त्यांनी पटवून दिलेले आहे. निसर्गावर सर्वच व्यक्ती प्रेम करतात. मात्र आपल्या बारीक-सारीक चुकांमुळे ते पर्यावरणावर कसे परिणामकारक ठरतात तेही त्यांनी आपल्या प्रस्तावनेतून मांडलेले आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे लेखिका या गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून स्वत रसायनमुक्त आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-मोठे प्रयोग करत आहेत. त्या प्रयोगातूनच त्यांनी पर्यावरणाला जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रस्तावनेच्या शेवटी डॉ. किरण कुलकर्णी म्हणतात, “वाचक हा नुसता वाचक न राहता या विषयासाठी कृतिशील होणे हेच या पुस्तिकेचे उद्दिष्ट आणि यश आहे.” हे विधान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

लेखिका या पुस्तकाच्या मनोगतामध्ये स्पष्टपणे नमूद करतात की, रोजच्या प्रयोगशीलतेतून पर्यावरणाचा विचार पुढे येत केलेले हे लेखन आहे. सोबत त्या वाचकांना काही अडचणी, प्रश्न असतील तर त्याबाबत संवाद साधण्याचे आवाहनही करतात. लेखिकेची पर्यावरणाशी असलेली निष्ठाच यातून जाणवते.

‘निसर्गनीती’ हे लेखिका राजश्री कुलकर्णी यांचे अनुभव कथनच. आपण पाहत असलेली आजूबाजूची परिस्थिती, अनुभव व प्रात्यक्षिक याची सांगड त्यांनी या पुस्तकात घातलेली आहे. पुस्तकात एकूण 14 प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरण हे आपल्या आयुष्याशी कसे निगडित आहे, त्याची अनुभूती आपणास जाणवते. लेखिकेने या लेखनाद्वारे समाजातील निसर्गमनाचा वेध घेतलेला आहे. अगदी आपल्या आजूबाजूला घडलेले प्रसंग व प्रत्यक्ष आपल्या हातून कळत-नकळत घडणाऱया चुका या निसर्ग आणि वसुंधरेला कशा घातक आहेत हे अगदी विस्तृतपणे मांडले आहे. या ठिकाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची एक उक्ती महत्त्वाची वाटते

बुडता हे जन न देखवे डोळां
येतो कळवळा म्हमउणि
याप्रमाणे लेखिका या बारीक-सारीक घटनेतून निसर्गाचे होणारे अधपतन कसे थांबवता येईल याविषयी चिंता व्यक्त करते. या पुस्तकामधील प्रत्येक प्रसंग हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला आहे. मात्र तो डोळसपणे टिपण्याची व संवेदनशीलपणे मांडण्याचे कसब लेखिकेने केलेले आहे. जगात आपणास सर्व काही दिसते. मात्र मांडण्याची प्रेरणा आणि प्रतिभा ही सगळ्यांकडे नसल्यामुळे ते प्रसंग, ते अनुभव तसेच खुंटतात. ‘निसर्गनीती’ पुस्तकात या बारीक-सारीक वाटणाऱया प्रसंगातून मानवी मनाचा वेध घेतलेला दिसून येतो.

या पुस्तकाचे वैविध्यपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे या पुस्तकाच्या शेवटी 45 प्रश्नांची प्रश्नावली दिलेली आहे. वरवर पाहता सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यातील रोजचेच वाटणारे हे प्रश्न मात्र त्यांची उत्तरे देताना आपला दृष्टिकोन पूर्णत बदलला जातो. हेच या पुस्तकाचे फलित आहे. हे लेखन सर्वसामान्य माणसाच्या हातून होणाऱया बारीक-सारीक चुका लक्षात आणून देते. मात्र वाचकाला किंवा समाजाला सल्ला देताना दिसत नाही. ते केवळ चिंतन करायला भाग पाडते. लेखिका पर्यावरण विषयक विचार मांडताना वाचकांशी जणू संवाद साधत आहे असेच वाटते. संवादी स्वरूपाची ही लेखनशैली प्रत्येक वाक्यातून लक्षात येते. त्यामुळे हा उपदेश नसून वाचकाने निसर्गनीतीला आपली जगण्याची स्वनीती म्हणून स्वीकार करण्याचा हा आग्रह असावा, असेच वाटते.

लेखिका केवळ अनुभव कथन न करता त्यावर प्रयोगशील कार्य करतात. उदाहरणार्थ स्वच्छतेचे लिक्विड, साबण, प्लास्टिकच्या वस्तू आवश्यक असल्यास त्यांचा पुनर्वापर अशा पद्धतीच्या सवयींनी लेखिका अधिक समृद्ध होताना दिसते. त्या घर स्वच्छ करण्यासाठी रसायन विरहित लिक्विड तसेच बाथरूम स्वच्छतेचे लिक्विड स्वत निर्मिती करतात आणि त्यातून उद्योगही साकारतात. इथे त्या लेखिका म्हणून थांबत नाही तर उद्योजक म्हणून पुढे येतात.

केवळ उपदेश न करता आपल्या सवयींमधूनच आपण एक सृजनशीलता कशी निर्माण करू शकतो हे ‘निसर्गनीती’ पुस्तकाच्या प्रत्येक पानापानांत दिसते. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय साधे, सरळ, तर मलपृष्ठ वेगळेपण दर्शविणारे आहे. लेखिकेने मलपृष्ठावर पर्यावरणपूरक माहितीसोबत स्वत रासायनिक विरहित तयार केलेली उत्पादने दिलेली आहेत. प्रत्येक पानावर निसर्गनीतीचा अनुभव देणारे हे पुस्तक समाजमनाला, सांस्कृतिक, आर्थिक व आरोग्य संपदेला टिकवण्यासाठी हातभार लावणारे वाटते.