…तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने मंगळवारी घेतला. हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पीओके आणि पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून हिंदुस्थानने दहशतवादी तळ उडवले. यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला असून याच पार्श्वभूमीवर गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती दिली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीमध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे मांडली. हिंदुस्थानी लष्कराचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात गुरुवारी ट्विट करत माहिती दिली आहे.

Operation Sindoor- पाकिस्तानात एकामागोमाग 12 शहरांत स्फोट, लाहोर-कराचीमध्ये प्रचंड घबराट; अणुतळाजवळ पोहोचले ड्रोन

सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडलेली भूमिका

– पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या हिंदुस्थानी लष्कराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
– या संकटाच्या काळामध्ये आम्ही सर्व एकजूट आहोत.
– पहलगाम येथे आपल्या बहि‍णींचे कुंकू पुसणाऱ्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला जात नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होणार नाही. या दहशतवाद्यांना दिल्लीतील इंडिया गेटसमोर आणा, त्यांची ओळख जगाला सांगा आणि त्यांना मारून पाकिस्तानमध्ये फेकून द्या. तरच आपला बदला पूर्ण होईल.
– पाकिस्तानचे स्लीपर सेल देशामध्ये सक्रिय असून आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ही जबाबदारी गृहमंत्रालयाची आहे.