दीडशे मतदारसंघात हजारो मतदारांची नावं काढून टाकली जात आहे असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच हे भाजपचं षडयंत्र आम्ही उधळूच आणि मतदारांचा विराट मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढू असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, हे महायुतीवाले ज्यांना आम्ही लफंगे म्हणतो, या लफंग्यांच्या साथीला पराभवाला घाबरल्यामुळे, निवडणुकीत आपण विजयी होऊ शकत नाही, आपण सत्ता गमावतोय अशी भिती या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आहे. या गृहखात्याचा अखत्यारित निवडणूक आयोग आहे. त्यांनी फार मोठे कारस्थान लोकशाहीविरोधात केलेले आहे. त्याची तक्रार घेऊन महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगाला भेटले. काही मतदारसंघ त्यांनी ठरवलेले आहेत. दीडशेच्या आसपास हे मतदारसंघ असून त्यासाठी विशेष अॅप तयार केलेले आहेत. आमच्या अधिकृत मतदारांची नावं यादीतून काढून टाकण्याचे काम सूरू आहे. या मतदारसंघातली आमची 10 हजार मतदार काढून टाकायची आणि तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त बोगस मतदार टाकायची. निवडणुकीत मतदार यादीत गोंधळ निर्माण करायचा, अशा प्रकारचे षडयंत्र उघड झालेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या टीम या कामात लागलेल्या आहेत. आणि त्या सगळ्यांचे सुत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं मला दिसतंय. हा तांत्रिक मुद्दा जरी असला तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे. मी इतकंच सांगेन की हे षडयंत्र आम्ही उधळूच, लोकांमध्ये जागृती निर्माण करू. आणि वेळ पडलीच तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा विराट मोर्चा आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढावा लागेल असेही राऊत म्हणाले.