
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाचा धूर कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सादरीकरण करत या अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले. त्यानंतर या विमान अपघाताची एएआयबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून तपासातून काही निष्पन्न होणार नाही, असे ते म्हणाले. ते शनिवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासातून काही निष्पन्न होणार नाही. रोहित पवार यांनी जे सादरीकरण दिले, त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर तपास झाला आणि झाला नाही हे शेवटपर्यंत कळणार नाही. अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे. त्या कंपनीमधील बेनामी मालक, गुंतवणूकदार कोण आहेत, याचा आधी तपास व्हायला पाहिजे, असे राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी राज्यसभेचे गणितही सांगितले.
घात की अपघात अजित पवार यांच्या विमान अपघाताची एएआयबीकडून चौकशी
शरद पवार हे धुरंधर राजकारणी, संसदपटू आहेत. तीन पक्ष मिळून एक जागा जाईल आणि तिन्ही पक्षांचे लोक निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान निवृत्त होत आहे. काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत आणि शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ, असे एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मध्यंतरी माझी शरद पवारांशी चर्चा झाली. त्यांना या विषयावर त्यांचे मत विचारले. त्यांनी सांगितले की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे. आता तीन पक्षात चर्चा होईल. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. 60 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे शरद पवारांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितली आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीत यावर चर्चा होईल.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दोन पक्षांचे विलीनीकरण झाले, तर पहावे लागेल. मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात. पण मला विलीनीकरण होईल असे वाटत नाही. झाले तर आनंद आहे. शरद पवारांना 45-50 मतं, ही त्यांची स्वत:ची होतील. पण महाविकास आघाडीकडे आता एक उमेदवार पाठवण्या इतके संख्याबळ आहे, असेही राऊत म्हणाले.
आम्हाला विनाकारण टार्गेट केले जात असल्याचे सुनील तटकरे म्हणाले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, कुणी टार्गेट केले? विरोधी पक्षाने केल्याचे दिसत नाही. ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष संशयास्पद मृत्यू पावला त्या कुटुंबातून हे हल्ले होत आहेत आणि समोर पुरावे दिले आहेत. जेव्हा माणूस पुराव्यासह बोलतो तेव्हा पुराव्याने उत्तर द्यायचे असते.





























































