मुंबईचं वारं बदललंय, कुणी आलं तरी त्याची टोपी उडून जाईल; मशाल-इंजिनला पर्याय नाही! – संजय राऊत

मुंबईचे वारे पूर्णपणे बदलले असून कुणीही आले तरी त्यांची टोपी उडून जाईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र मोदी मुंबई दौरा करणार नसल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत उत्तर देत होते.

संजय राऊत म्हणाले, मुंबईचे वारे पूर्णणे बदलले असून कुणी आले तरी त्यांची टोपी उडून जाईल. खरे म्हणजे मोदींनी यायला पाहिजे आणि मुंबईत वारे काय चालले ते पाहायला पाहिजे. आमचे त्यांना आव्हान आहे. मोदी, योगी, मध्य प्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री येऊ द्या. मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकेल. मशाल आणि इंजिनला पर्याय नाही.

ऑस्ट्रेलियात मतदान करत नाही, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जातो. तसा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतो, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, मतदान कोण करू देत नाही? मतदार यादीतून नाव वगळून, एमआयआरसारख्या योजना आणून, गावागावात दहशत निर्माण करून तुम्हीच मतदान करू देत नाहीत. खरे म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांवर आणि निवडणूक आयोगावर कारवाई व्हायला पाहिजे. पक्ष फोडून, पक्ष फोडायला निवडणूक आयोगाने मदत करून, मतदानामध्ये गोंधळ निर्माण करून आपल्या विचाराचे, भूमिकेचे नाही त्यांना मतदान करू द्यायचे नाही, असा प्रकार राज्यात सुरू आहे.

भाजप मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा; वैचारिक आधार भक्कम असता तर, MIM सोबत युती झाली नसती! – संजय राऊत

बिनविरोध निवडणुकीवरून राजकारण तापलेले असताना फडणवीस यांनी काँग्रेस काळात 33 खासदार बिनविरोध निवडून आल्याचे म्हटले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, देशभरातून 33 खासदार निवडून आले तेव्हाची राजकीय परिस्थिती आजच्या सारखी नव्हती. स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळात त्या वातावरणात अनेक लोक बिनविरोध निवडून आले. साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराज चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी उभ्या राहिले तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी तिथे आपला उमेदवार टाकायचा नाही असे ठरवले आणि ती निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्रात अशा अनेक बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, पण ती टोलेजंग माणसं होती. उमेदवारी अर्ज न भरणे किंवा अर्ज भरल्यावर माघारी घेणे आणि सर्व पक्षांनी सामूदायिक निर्णय घेऊन बिनविरोध निवडून देणे यात फरक आहे, असे राऊत म्हणाले.

पाप केलेला नगरसेवक, तर अति पाप केलेला महापौर बनतो असेही विधान फडणवीस यांनी केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, स्वत: फडणवीस महापौर आणि नगरसेवक होते. त्यांची कारकिर्द ही नागपूरचे नगरसेवक म्हणून सुरू झालेली आहे. खूप मोठे पाप केल्यावर ते महापौर झाले, त्याहून मोठे पाप केल्यावर आमदार झाले आणि महापाप केल्यावर राज्याचे मुख्यमंत्री झाले, असा टोला राऊत यांनी लगावला.