
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा पुढे आली. यावर दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळी विधाने करत आहेत. शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले, तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी अशी चर्चाच झाली नसल्याचे म्हटले. अशातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष झाल्याचे म्हटले, मात्र काही वेळातच घुमजाव केले. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ‘पटेल’ तेच करा असे म्हणत हा निर्णय घेण्याचा सर्वाधिकार त्यांच्या पक्षाचा असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरही टीका केली. ते बुधवारी दिल्लीत माध्यमांशी साधत होते.
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार तो पक्ष चालवत होते. त्याच्यामुळे भाजपची परवानगी घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. ज्या अर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाहीत, त्या अर्थी या बाबतीत त्यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल. हा त्यांचा अंतर्गत, कौटुंबिक विषय होता. प्रत्येक गोष्ट ही मोदी किंवा महाराष्ट्रात फडणवीस यांना सांगितली पाहिजे, किंवा त्यांना विचारूनच निर्णय घेतले पाहिजे हा हट्ट कशासाठी? हा अनाठायी हट्ट आहे. अजित पवार हे राज्याचे महत्त्वाचे नेते होते. त्याहीपेक्षा ते शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबाचे एक कर्ते पुरुष होते. त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल किंवा दोन पक्षातील प्रमुख नेत्यात चर्चा झाली असेल. त्यामुळे माझ्याशी चर्चा झालीच नाही हा अट्टाहास योग्य नाही.
अजित पवारांचा पक्ष पवारांचा पक्ष होता, पटेलांचा नाही. त्यांनी चिडचिड करू नये. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याही पेक्षा ते मोदी-शहांचे भक्त आहेत. त्यांनी ते कार्य करत रहावे. पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला पटेल तेच करा, असे संजय राऊत म्हणाले.
अध्यक्षाचा निर्णय कुटुंबच घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच कुटुंब आहे, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्यांचे म्हणणे बरोबर आहे, असे म्हणत संजय राऊत पुढे म्हणाले की, त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेत्यांना अमित शहा आदेश देतील त्यानुसार ते निर्णय घेतील. एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष अमित शहांनी स्थापन केलेले आहेत. त्यांची प्रायव्हेट लि. कंपनी आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया (बीजेपी) ही त्यांची प्रायव्हेट लि. कंपनी आहे आणि त्या कंपनीचे हे सगळे शेअर होल्डर आहेत. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि अमित शहा हे दोघेच त्यांच्याबाबत निर्णय घेतील, अशी टीकाही राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, अजित पवारांनी भाजपचा अजेंडा स्वत:वर थोपवून घेतला नाही. अजित पवार हे शरद पवारांप्रमाणे शाहू-फुले-आंबडेकर-यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला मानणारे राजकीय नेते होते आणि भाजप बरोबर गेले तरी त्यांनी शिंदेप्रमाणे स्वत:चा विचार खुंटीला टांगून ठेवला नव्हता. ते स्वत:च्या विचारानेच काम करत होते. हे बहुतेक देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल.


























































