“राज्यातील अहंकारी सरकारला घोडेबाजाराचा छंद लागलाय, प्रत्येक निवडणूक पैशाच्या ताकदीवर…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील अहंकारी सरकारला घोडेबाजाराचा छंद लागला असून प्रत्येक निवडणूक पैशाच्या ताकदीवर लढवायची ही त्यांची मानसिकता झाली आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शनिवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.

राज्यसभेप्रमाणे राज्यातील विधानपरिषद निवडणूकही बिनविरोध होईल का? हा प्रश्न संजय राऊय यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, सध्याचे सरकार अहंकारी असून त्यांना घोडेबाजाराचा छंद लागला आहे. रेसकोर्सवर पूर्वी लोक घोड्यावर पैसे लावायला जायचे, तसेच सरकारकडे भ्रष्टाचार, ठेकेदारीच्या माध्यमातून आलेला प्रचंड पैसा आहे. त्यांना घोडेबाजार करण्याची नशा, चटक लागली आहे. म्हणून प्रत्येक निवडणुका या पैशाच्या ताकदीवर लढायच्या ही त्यांची मानसिकता झाली आहे. तरी महाविकास आघाडीचे आमदार या निवडणुकीत मतदान करताना कोणतेही चुकीचे पाऊल उचणार नाहीत, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. आमच्याकडे साधारण मतांचा एवढा कोटा आहे की, आम्ही मनात आणले आणि सर्व काही ठिकठाक राहिले तर विधान परिषदेत आमच्या 2 जागा जाऊ शकतात. एक तर नक्कीच जाईल, पण दुसरीही जावू शकते, असेही राऊत म्हणाले.

“राज्यातील अहंकारी सरकारला घोडेबाजाराचा छंद लागलाय, प्रत्येक निवडणूक पैशाच्या ताकदीवर…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

विधिमंडळात विरोधी पक्षाचा आवाज असायलाच पाहिजे हे सत्ताधाऱ्यांनी आधी स्वीकारले पाहिजे. विधिमंडळात विरोधी पक्ष असूच नये, संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष असू नये या मानसिकतेतून सरकार सध्या काम करत आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घोडेबाजाराला चालना मिळते, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पुन्हा विधिमंडळात जाणे गरजेचे

उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना जो काळ मिळाला राज्य करण्याचा, त्यात कोरोनापासून अनेक संकटं निर्माण झाली. तरीही त्यातून महाराष्ट्राला सावरलं, नेतृत्व केले आणि त्यांना विकासाची, विचारांची दिशा आहे. विधिमंडळात आणि बाहेर ते विरोधी पक्षाचा एक बुलंद आवाज आहेच. त्यामुळे विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची इच्छा आहे की उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधिमंडळात जाणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.