
आमच्या कष्टाच्या, घामाच्या पैशातून आम्ही घर घेतले आहे. मात्र हे सुडाचे राजकारण सुरू असून अशा प्रकारचे वातावरण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हते, अशा भावना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. संजय राऊत यांच्या राहत्या घरावर आलेल्या ईडीच्या जप्तीनंतर वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ही पाशवीपद्धतीची कारवाई असून अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
ईडीकरून करण्यात आलेल्या कारवायांनंतर संजय राऊत यांनी ट्विटर हँडलवरून असत्यमेव जयते असे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी वृत्तवाहिनीला सविस्तर माहिती दिली. ईडीने कारवाई करण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नव्हती असे त्यांनी सांगितले. याची चौकशी करून जर यातील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत: माझी संपत्ती भाजपला देईन, असेही ते म्हणाले. आम्ही जी घरं घेतली ती कष्टातून घामातून आलेल्या पैशाने घेतली आहेत. संजय राऊत काय आहे हे शिवसेनेला, महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे, असेही ते म्हणाले. तपास यंत्रणा या राजीकय दबावाखाली कारवाया करत असून मी कुणापुढेही गुढघे टेकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असून सरकार पडत नसल्याने या कारवाया सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कधी ना कधी याचे हिशोब तुम्हाला द्यावे लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
ईडी माझ्या मागे लागली आहे हे मला माहित होती. सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. मात्र मी कधीही झुकलो नाही, झुकणार नाही. आरोप सिद्ध झाले तर मी माझी संपत्ती भाजपला दान करेन, मी राजकारण सोडेन. पण येत्या काळात सत्य काय आणि असत्य काय ते कळेल असेही त्यांनी सांगितले.
मी कोणती माहिती कधीही लपवलेली नाही. राज्यसभेचा मी खासदार आहे. प्रतिज्ञापत्रात माझ्या संपत्तीची माहिती दिली आहे. आयकर विभागाकडेही त्याची माहिती आहे, तेव्हा माझ्याविरुद्ध सूडाच्या भावनेतून ही कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.

























































