अजित पवारांच्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सर्वात आधी गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांची पोलीस अधिकाऱयांसोबत बाचाबाची झाली. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना राज्य सरकार, VSR कंपनी, DGCA वर जोरदार टीका केली. ”अजित पवारांच्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सर्वात आधी गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे”, असा घणाघात त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच यावेळी त्यांनी ”विधीमंडळातून एका वजनदार व्यक्तीचा फोन आल्याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील उपायुक्तांनी रोहित पवार यांची तक्रार घेतली नाही”, असे देखील यावेळी सांगितले.

”राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचा एक नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू इच्छितो आणि त्याच वेळी विधीमंडळातून पोलिसांना एक फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? मग तुमचे जे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते का? डीजीसीएने अशा अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केल्या आहेत. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान पडलं काय झालं त्याच्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय पण पायलट जबाबदार नाही. ड्रीमलायनरमधल्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत. ते बाहेर काढलं जात नाहीए. VSR कंपनीचं जे विमान पडलं ते प्रकरण पण दाबलं जातंय. रोहित पवारांची तक्रार देखील दाखल करून घेत नाही. म्हणजे तुम्ही काहितरी लपवतायत. या कंपनीत अनेक राजकारण्यांचे पैसे गुतलेले आहेत. स्वत: या खात्याचे मंत्री रामा नायडू हे टीडिपी पक्षाचे आहेत. चंद्राबाबू आणि या VSR कंपनीच्या मालकाची आर्थिक देवानघेवाण आहे. काय तपास करणार? अनेक विषय आम्ही समजून घेतले. रोहित पवार ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडतायत ते लोकांसमोर आले पाहिजे. अजित पवार यांचे प्राण गेले. या पुढे इतर कुणाचे प्राण या पद्धतीने जाऊ नये असं मला वाटतं, असे संजय राऊत म्हणाले.

”मुंबईत तक्रार दाखल करणं गरजेचं होतं पण तक्रार घेतली नाही. त्यामुळे रोहित पवार आज बारामतीत अजित दादांच्या शेकडो चाहत्यांसह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विधीमंडळात देखील हा प्रश्न घेतला पाहिजे व मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. सगळ्यांना उदंड आय़ुष्य मिळो पण भाजपच्या जर एखाद्या नेत्याचं काही बरंवाईट झालं असतं तर भाजप शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारांना एवढं हलक्यात घेतायत. त्यांना उपमुख्यमंत्री केलं, त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेवर पाठवलं की ती फाईल बंद होते का? याला कोण जबाबदार आहे ते समोर यायला पाहिजे. अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतका विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे. सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सर्वात आधी गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे. सिव्हिल एविशन मंत्र्याने घेतली पाहिजे. डिजीसीएने घेतली पाहिजे. या सगळ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. जर तुम्ही त्यांना पाठिशी घातले तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

“सिव्हिल एविएशन हे केंद्र सरकारमधलं सगळ्यात भ्रष्ट खातं आहे. या DGCA ने आता पर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केले आहेत. तरिही कुणी त्यांचं वाकडं करू शकलं नाही. खाजगी विमान कंपन्यांच्या क्षेत्रात DGCA चा आशिर्वाद असणं महत्त्वाचं असतं. ते अनेक पायलटांचं आयुष्य खराब करू शकतात, तुमचं लायसन्स रद्द करू शकतात. VSR कंपनी आणि DCGA वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे व त्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत. आपल्या पतीच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीत त्यांनी सुद्धा तेवढाच रस घेतला पाहिजे जेवढा आम्ही घेतोय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं की तुम्ही गृहमंत्री आहात मग पोलीस एफआयआर दाखल का करून घेत नाही?”, असे संजय राऊत म्हणाले.