कोणीही बांधा, पण अयोध्येत राममंदिर हवेच; संजय राऊत यांचे ठाम प्रतिपादन

32
sanjay raut
फाईल फोटो

मनोज श्रीवास्तव । लखनौ

कोणीही बांधा, पण अयोध्येत राममंदिर व्हायलाच हवे, असे ठाम प्रतिपादन सोमवारी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले. राममंदिर हा जुमला नाही, तर श्रद्धेचा विषय आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीपूर्वी मंदिर बांधकामाला सुरुवात झाली पाहिजे यासाठीच आमचे प्रयत्न असल्याचेही राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 व 25 नोंव्हेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासाठी खासदार संजय राऊत अयोध्येत असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जर शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली नसती तर आज कुणीच राममंदिर उभारणीची चर्चा केली नसती. राममंदिर बांधण्यासाठी शिवसेना वचनबद्ध असून हा मुद्दा श्रद्धेचा आहे. त्याचे कुणी राजकारण करू नये. राममंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न असल्याचेही राऊत म्हणाले.

बहुमत असूनही चालढकल का?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राममंदिर हा निवडणुकीचा मुद्दा असू नये असे म्हटले आहे असे सांगून खासदार राऊत यांनी केंद्र सरकारच्या कासवछाप कारभारावर टीका केली. ते म्हणाले, संसदेत बहुमत असतानाही जर राममंदिर बांधता येत नसेल तर हा विषय येथेच बंद केलेला बरा. जर भाजपने राममंदिराचा अध्यादेश आणला तर इतर पक्षांचे खासदारही त्याला पाठिंबा देतील. मात्र अध्यादेश आणण्यासाठी भाजपची काही अडचण असेल तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे.

न्यायालय काय करणार?

या प्रश्नात न्यायालय काही करू शकत नाही. हा श्रद्धा आणि आस्थेचा मामला आहे. न्यायालय कुठल्याही एका बाजूने निर्णय देईल, पण तो आम्हाला मान्य नाही. केंद्र सरकारने अध्यादेश आणावा आणि 2019 पूर्वी मंदिर बांधकाम सुरू करावे अशी आमची मागणी आहे, असे खासदार राऊत म्हणाले.

घाबरण्याची गरज नाही !

आमची कुणाशी स्पर्धा नाही. आम्हाला फक्त अयोध्येत राममंदिर हवे आहे असे स्पष्ट करून खासदार राऊत म्हणाले, आम्ही अयोध्येत दहशत माजवण्यासाठी येत नाही. बाबरीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्याशी मी बोललो आहे, भेटलो आहे. कुणाला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

उद्धव ठाकरे यांचा दौरा कार्यक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता अयोध्येत आगमन होईल. दुपारी 3 वाजता ते लक्ष्मण विला येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी महंत नृत्यगोपाल दास महाराजसुद्धा उपस्थित असतील. सायंकाळी साडेपाच वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीची महाआरती करण्यात येईल. 25 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता उद्धव ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेतील आणि त्यानंतर फैजाबाद येथील गुलाबवाडीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतून आलेल्या शिवसैनिक, शिवसेनाप्रेमींशी जनसंवाद करतील. ही सभा नसेल, तर राममंदिराच्या विषयावर जनतेशी थेट संवाद असेल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या