फडणवीसांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली; कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र? संजय राऊत यांचा घणाघात

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी विधिमंडळात टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत दोघांचे कार्यकर्ते भिडले. या राड्याचा व्हिडीओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

संजय राऊत यांनी विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याचा व्हिडीओ एक्स (आधाची ट्विटर) शेअर केला आहे. संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँग वॉर झाले. भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

शीSS शीSS शीSS शीSS… लाज घालवली, विधिमंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले, विधान भवनात अक्षरशः टोळीयुद्ध; लॉबीत दंगल

फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली. आज ज्याने विधानभवनात दंगल केली ते आमदार पडळकर टीम देवेंद्रचे सदस्य आहेत. मोदी शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे? अत्यंत वेदनादायी असे हे चित्र आहे. खरंच कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र? असा सवाल राऊत यांनी केला.