मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही! संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात

मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांवर केला. रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आपल्या खास शैलीत मिंध्यांचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे भिजलेली फटाका आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पॉवर दिलेली, त्याच्यावर त्यांचे फटाके वाजताहेत. ज्या दिवशी मुंबई, ठाणे महानगरपालिकेचा निकाल लागेल तेव्हा ते ठाणे, मुंबई सोडून जातील, असेही राऊत म्हणाले.

‘विधानसभा निवडणुकी वेळी मतदार यातीत घोटाळा केला नसता तर गद्दारांच्या तेव्हाच ठिकऱ्या उडाल्या होत्या. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला निवडून आणलेले नाही, हे मी वारंवार सांगतो. कारण इतक्या जागा जिंकून महाराष्ट्रात कुठेही जल्लोष झाला नाही. निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून, मतदार यादीत घोटाळे करून, पैशांचा प्रचंड वापर करून, यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला आहात. पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार नाही’, असे संजय राऊत यांनी ठणकावले.

‘निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पहिला हल्ला केलेला आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांधील साटेलोटे उघड केले आहे. आता त्याच्याही पुढे एक पाऊल जाण्याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळातील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने दबावाखाली काम करतोय आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदन देतो, भेटतोय, भूमिका सांगतोय, पुरावे देतोय.. तरी सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल’, असेही राऊत म्हणाले.

‘सर्वपक्षीय नेत्यांमध्ये याबाबत एकमत होताना दिसत असून काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. शरद पवार, डावे पक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा करून पुढले पाऊल काय टाकायचे हा निर्णय घेतला जाईल’, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबईत घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायचे जे स्वप्न आहे, ते पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राची जनता, मुंबई-ठाण्याची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही.’

सत्तेतून एक दिवस राजीनामा द्या आणि…

आनंद दिघे यांचा अपमान गद्दारांनी केला, त्यांना ठाणेकर खरोखरच सोडणार नाहीत. आनंद दिघे या निष्ठावान शिवसैनिकाच्या, शिवसेने नेत्याचा निष्ठेबाबत जो विचार होता त्याला तडा कुणी दिला, तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर आनंद दिघे यांच्या ठाण्यातील तुळशी वृंदावनात उगवलेली भांगेची रोपटी आहेत. तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही. सत्तेतून एक दिवस राजीनामा द्या आणि बाहेर या, मग सांगतो कोण कुणाला सोडतो, असा इशाराही राऊत यांनी दिला.