मिंध्यांना ‘लॉटरी’ नाही, तर ‘मटका’ लागला; त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसलाय; संजय राऊत यांचा घणाघात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी नाही तर मटका लागला. त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आले पाहिजे, असे भाजप नेते गणेश नाईक ठाण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘कुणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा कधीकाळी लॉटरी चालवत होते. पण आज महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो. गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला असावा, पण त्यांना मटका हा शब्द वापरायचा असेल.’

गणेश नाईक हे सुद्धा पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. एकनाथ शिंदे यांचा राजकारणातला उदयही झालेला नव्हता तेव्हापासून गणेश नाईक राजकारणात आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी त्यांनी कधी शिवसेनेवर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका केली नाही. अनेकदा ते भाजपात किंवा इतर पक्षात असल्याने आम्ही त्यांच्यावर टीका केली, पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावर प्रति टीका केली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

गणेश नाईक यांना मंत्रिपदापलीकडे काही करता आले नाही, असे विचारले असता राऊत म्हणाले की, ‘त्यांनी मटका लावला नाही. ते शिवसेनेमध्ये आमदार होते. एकदा त्यांचा पराभव झाला. ते शांत राहिले आणि परत आमदार, मंत्री झाले. ते सतत प्रवाहामध्ये होते. त्यांनी एकदा प्रभाव बदलला आणि ते पवारांकडे गेले, आता भाजपमध्ये आहेत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या गतीने गरतात. पण त्यांनी जे विधान केले ते सूचक विधान असून ठाणे जिल्ह्यात जाऊन केले आहे.’

ताईंच्या रुग्णालयाच्या जागेवर दादांचे कांदळवन, नवी मुंबईत गणेश नाईक विरूद्ध मंदा म्हात्रे वाद पुन्हा पेटणार

शिंदे-भाजपावर टीका

संजय राऊत म्हणाले की, मटक्याचे आकडे फार चंचल असतात. चार-चार लोक मटका चालवतात. भाजपचे चंगू, मंगू, टंगू विचारतील, पण एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रात पत्रकारिता केल्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना मटका लागलेला असून मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळी वेगळा, दुपारी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा असतो. हे आकडे कुणालाही सांभाळता येत नाही आणि कुणालाही हवा तो आकडा काढता येत नाही. यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसला आहे. तिथे जाऊन ते आकडा लावण्याचा प्रयत्न करतात, पण आकडा लागत नाही. लवकर त्यांचा अस्तंगत होईल, अशी टीका राऊत यांनी केली.

नगरविकास खात्याने नवी मुंबईची वाट लावली, गणेश नाईकांचा मिंध्यांवर निशाणा