‘लोकसभा मे निपट लिया’ म्हणून राज्यसभेतून पळ काढला, संजय राऊत यांचा मोदी-शहांवर निशाणा

राज्यसभेत बुधवारी ‘ऑपरेशन ‘सिंदूर’वर चर्चा झाली. मात्र, पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांनी उपस्थित राहून प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे विरोधी बाकांवरील सदस्यांचे म्हणणे होते. त्यासाठी विरोधकांनी ‘पंतप्रधानांना बोलवा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर अमित शहा यांनी ‘मेरे से निपट लो, काहे को प्रधानमंत्री जी को बुला रहे हो।’, असे म्हणत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शहा यांनी केलेल्या विधानाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना समाचार घेतला. ‘लोकसभा मे निपट लिया’ म्हणून राज्यसभेतून पळ काढला, अशी बोचरी टीका राऊत यांनी मोदी-शहांवर केली.

शहांच्या विधानाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनीच पंतप्रधानांना निपटवले होते. लोकसभेत पंतप्रधानांची काय अवस्था झाली ते आम्ही पाहिले. प्रियंका गांधी, गौरव गोगोई, राहुल गांधी यांनीच मोदींना लोकसभेत निपटवले, त्यामुळे त्यांची राज्यसभेत येण्याची हिंमत झाली नाही. राज्यसभेत येऊन उत्तर देण्याची त्यांची जबाबदारी होती, पण त्यांनी पळ काढला.

राज्यसभेत चर्चेवेळी मोदी डोकावलेही नाहीत. मोदी हिंदुस्थानात डोकावायलाच तयार नाहीत. हिंदुस्थानातील कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावून पाहायला तयार नाहीत. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, पण ते देशाला ओझे झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या अनेक लोकांनाही ओझे झाले आहे. देश वाचवायचा असेल, देशाचा कणा मोडू द्यायचा नसेल तर भाजपांतर्गत आणि बाह्य शक्तीने म्हणजे विरोधी पक्षांनी सुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणे गरजेचे आहे. 6 तारखेला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यामध्ये याबाबत चर्चा होऊ शकते, असेही राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.

पीओकेसाठी आम्ही बलिदान देऊ, असे अमित शहा लोकसभेमध्ये म्हणाले होते. पण बलिदान देण्याची, पीओके घेण्याची संधी आले तेव्हा शहा आणि त्यांचे सरकार पाकिस्तानपुढे सरेंडर झाले. पीओके सोडा, पण सरकार म्हणतेय की पाकिस्तान शरण आला. मग शत्रूला सोडले का? हिंदुस्थानचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोडण्याची मागणी का केली नाही? आपले 400 मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत, त्यांना तरी सोडवायचे. मोदी, शहा फक्त मोठ्या बाता करतात, खोटी आश्वासने देतात. पण लोक फसणार नाहीत. पीओकेसाठी बलिदान देण्याची वेळ आली तेव्हा हे मैदान सोडून पळाले, अशी टीका राऊत यांनी केली.

मोदींच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर टॅरिफ लादल्यापासून भाजपची वाचा गेलीय, सरकारने शेपूट घातले – संजय राऊत

दरम्यान, हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात कोणत्याही नेत्याने मध्यस्थी केली नाही, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केले. त्यानंतर काही तासातच ट्रम्प यांनी आपणच मध्यस्थी केली असा पुनरुच्चार केला. याचा समाचार घेत राऊत म्हणाले की, ट्रम्प या देशाच्या पंतप्रधानांना, सरकारला फाट्यावर मारतोय. कारण इथे दुबळे, लाचार, डरपोक सरकार आहे. सरकारचे हात व्यापाराच्या दगडाखाली अडकले आहेत. यांना काही उद्योगपतींचा व्यापार अमेरिकेसह जगभरात पसरवायचा आहे. त्यासाठी हे प्रे. ट्रम्प यांची दादागिरी सहन करत आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.