
राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला त्यांच्या निवासस्थानी यूपीए म्हणजे ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनडीएची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये मोदींचा सत्कारही होणार आहे. हा सत्कार कशाकरता? मोदी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त होताहेत म्हणून की आणखी कशाकरता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर‘ थांबवले नसते आणि वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात घेतले असते तर आम्हीही मोदींचा सत्कार केला असता, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या भीतीमुळे मोदींनी एनडीएची बैठक बोलावली. हा त्यांचा जुना कार्यक्रम आहे. त्यामुळे आमच्या बैठकीवर परिणाम होणार नाही. आजच्या बैठकीत मोदींचा सत्कारही होणार आहे. खरे म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवले नसते आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात घेतले असते तर आम्ही सगळ्यांनी मोदींचा नक्की सत्कार केला असता. लाहोर, कराची, बलुचिस्तान वगैरे… पीओके घेणार असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. पण त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली नाही याबद्दल आम्हाला दु:ख होत आहे.
चीनच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी परखड भाष्य केले. चीनने हिंदुस्थानची जमीन गिळलेली आहे. चीन पेंगाँग लेकपर्यंत घुसला आहे. चीनने आमच्या हद्दीत रस्ते-पूल बांधले. चीनच्या सैन्याच्या हालचाली तिथे सुरू आहेत. कालच्या युद्धातही चीनने हिंदुस्थानविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला मदत केली. त्यामुळे चीन संदर्भात प्रश्न निर्माण करणे यात राष्ट्रभक्तीचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
चीनने जमीन हडपली हे तुम्हाला कसं कळलं? सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधी यांना सवाल
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत. प्रत्येक देशवासियाच्या मनात हाच प्रश्न आहे की, चीनने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केले की नाही? 1962 नंतरच्या युद्धानंतर अटल बिहारी वाजपेयींपासून ते सगळ्यांची भाषणे पाहिली तर तेव्हाही तिबेटपासून ते अक्साई चीनपर्यंत चीनने अतिक्रमण केल्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. आताही सध्याचे राज्यकर्ते तेच करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी चीन संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये काही चुकतेय असे वाटत नाही. हा संपूर्ण देशाच्या मनातला प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान #sanjayraut #shivsenaubt #mns #saamana pic.twitter.com/FjFWQdahQH
— Saamana Online (@SaamanaOnline) August 5, 2025
आज 5 ऑगस्ट असून पंतप्रधान मोदी राजकीय स्वार्थासाठी काय घोषणा करतील सांगता येत नाही. ते अचानक येऊन घोषणा करतात आणि देशाचे वाटोळे करतात. आज बहुतेक ते ट्रम्पविरुद्ध काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा करतो. ट्रम्प हिंदुस्थानला धमक्या देताहेत, भारत-पाक युद्ध थांबवल्या संदर्भात भूमिका घेताहेत. त्यामुळे आज एनडीएच्या बैठकीत मोदी बहुतेक सांगतील की, आता मी ट्रम्पला धडा शिकवतो. तसे केले तर आम्ही नक्कीच त्यांचा सत्कार करू, असेही राऊत म्हणाले.
युक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची पर्वा नाही! हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी