
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावला. रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्रास्त्र खरेदी केली म्हणून हिंदुस्थानला दंडीत करण्याचे कामही मोदींचे मित्र प्रे. ट्रम्पने केले. तेव्हापासून भाजपची वाचा गेली आहे. जीभ लुळी पडलेली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री जयशंकर गायब झाले आहेत, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला. इतकेच नाही तर रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी केली म्हणून दंडही लावला. याचाच उल्लेख करत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. राऊत म्हणाले की, मोदींच्या मित्राने हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावला. आमचा भारत वेगळा असून मोदींचे राष्ट्र वेगळे आहे. भाजपचे मोदीराष्ट्र असून आम्ही भारताचा विचार करतो. अमेरिकेने रशियाबरोबर आपण शस्त्रांचा व्यवहार केला म्हणून हिंदुस्थानला दंडीत केले आहे. हिंदुस्थानला दंडीत करणारा ट्रम्प आहे कोण?
टॅरिफवर चर्चा होईल, पण रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्रास्त्र खरेदी केली म्हणून हिंदुस्थानला दंडीत करण्याचे काम मोदींचा जिवश्च, कंठश्च मित्र प्रे. ट्रपने केले आहे आणि त्यानंतर भाजपची वाचा गेली आहे, जीभ लुळी पडलेली आहे. मोदी, शहा, जयशंकर गायब झालेले आहेत. एका शब्दानेही त्यांनी आपली जीभ टाळ्याला लावलेली नाही. अख्खा देश अस्वस्थ आहे. काल ट्रम्पने पाकिस्तानचीही तारीफ केली आणि तेल, पेट्रोलियम पदार्थांसंदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार एकत्र काम करणार आहे. याचाच अर्थ पाकिस्तानला आर्थिक ताकद देण्याचे काम मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
या सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प असे लिहितात की, भविष्यामध्ये कदाचित पाकिस्तानकडून हिंदुस्थान तेल खरेदी करेल. म्हणजे जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहेत की, आपल्याला पाकिस्तानकडून तेल घ्यावे लागेल. पाकिस्तानसोबत व्यापार करावा लागेल. दहशतवाद विसरावा लागेल. त्यामुळे हिंदुस्थान विरोधात पाकिस्तानला ताकद देण्याचे काम ट्रम्प करत असतील तर हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी याचा धिक्कार आणि निषेध करणे आवश्यक आहे. कारण गेली 60 वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करत आलो आहोत. आम्ही लढत आहोत. पंडित नेहरू लढले, इंदिरा गांधी लढल्या, मनमोहन सिंग लढले, अटल बिहारी वाजपेयीही लढले आणि या सरकारने शेपूट घातले, अशी टीका राऊत यांनी केली.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरलाय का? याचे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेऊन अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मी राज्यसभेत केली. ही मागणी सगळ्या विरोधी पक्षाने करायला हवी. टॅरिफ लादून ट्रम्पने हिंदुस्थानमध्ये हाहाकार माजवला आहे. हिंदुस्थानचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केला. याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहेत का? वयाची पंचाहत्तरी व्हायची कसली वाट पाहताय? असा सवाल करत संजय राऊत यांनी ज्यांना हा देश कळतो, देशाची अर्थव्यवस्था कळते त्यांच्याकडे नेतृत्व सोपवायला पाहिजे, अशी मागणी केली.