
पांडुरंग महाराष्ट्राची अस्मिता आहे. कष्टकऱयांचा, श्रमिकांचा हा देव आहे. पांडुरंगाच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे; पण आता तिची ‘गद्दारांची भूमी’ अशी ओळख बनली आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी पांडुरंगाने सर्वांना सुबुद्धी द्यावी, असेच साकडे पांडुरंगचरणी घालतोय, अशी भावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
खासदार संजय राऊत यांनी सहकुटुंब आज सकाळी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सुनील राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, जे डरपोक आणि स्वार्थी होते, ते आमच्यातून पळून गेले. जे राहिले ते कडवट आणि निष्ठावंत आहेत. त्यांच्या जोरावर शिवसेना महाराष्ट्रात पुन्हा नव्या जोमाने उभी राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. शरद पवार यांचा या वयात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. एका बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा संघर्ष सुरू आहे. आम्ही सगळे संघर्ष करतोय. कारण देश आणि महाराष्ट्र वाचवायचा आहे. असे संजय राऊत म्हणाले.
भुजबळांचा पराभव करणारच
आगामी विधानसभेत येवल्याचा आमदार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच असेल, असा विश्वास व्यक्त करून खासदार संजय राऊत म्हणाले, येवल्यात आम्ही भुजबळांचा पराभव करणारच! पांडुरंगाच्या दारात मी हे सांगतो आहे. यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेने त्यांचा पराभव केलेला आहे.



























































