
भारतीय जनता पक्षाचे नेते शेअर बाजारातले दलाल आहेत. त्यांना मुंबई जुगारावर लावायची आहे. भाजप हा व्यापाऱ्यांचा, शेठजींचा पक्ष आहे आणि शेठजींनी मुंबई, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू नये, असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱ्यांच्या हाती आम्ही शिवसेना दिली, असे वक्तव्य अमित शहा यांनी केले होते. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याचा समाचार घेतला. अमित शहा हे देशावर लादलेले गृहमंत्री आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार आम्हाला शिकवू नयेत असे ठणकावतानाच, आज शिवसेनाप्रमुख असते तर तडीपारी आणि मर्डर केसमध्ये अडकलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना वाचवल्याचा त्यांना पश्चात्ताप झाला असता, असे संजय राऊत म्हणाले.
अजूनही त्या 26 मायभगिनींच्या घरचा आक्रोश संपलेला नाही, पण अमित शहा नांदेडला ‘आदर्श’फेम अशोक चव्हाण यांच्या घरी आमरस पुरी आणि ढोकळा खात होते. भाजप सरकारच्या कर्मदरिद्रीपणामुळे सोमवारी अख्खी मुंबई बुडाली होती आणि शहा तिकडे राजकारण करत होते, हे त्यांचे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी कोठे आहेत? ते गुजरातमध्ये पळाले, की त्यांना भाजपने दाहोदमध्ये लपवले, असा सवालही त्यांनी केला. शहा यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती, असे म्हणत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.
थोडी जरी नैतिकता असेल तर शहांनी राजीनामा द्यावा
केंद्रीय गृह मंत्रालयाचे काम अतिशय अपयशी, बिनडोक आहे. पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पहलगाममध्ये 26 माताभगिनींचे कुंकुू पुसले गेले. त्याला गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे जवानांमुळे यशस्वी झाले. मात्र, यातही भाजपचे अपयश आहे. ट्रम्प यांच्या धमकीमुळे त्यांनी माघार घेतली. देशहिताचा विचार करून विरोधी पक्ष त्यावर जास्त वक्तव्ये करत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे शरण गेले नाहीत याचा भाजपला राग आहे
भाजपने महाराष्ट्रात बेईमानीचे बीज पेरले. त्या बेईमानीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरण गेले नाहीत याचा भाजपला राग आहे. हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना त्यांनी स्वार्थासाठी पह्डली यासाठी बाळासाहेबांनी त्यांना मिठी मारली असती काय? हा बाळासाहेबांचा अपमान आहे, महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही, असेही संजय राऊत यांनी बजावले.