
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांवरून आता राजकीय वादंग पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ जाहीर झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजपवर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
‘छान! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान’ संजय राऊत यांनी ‘X’ वर एक उपरोधिक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.
‘महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्मभूषण किताबाने सन्मानित केले’, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला, त्यांचा सन्मान करून भाजपने महाराष्ट्राचाच अपमान केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जुन्या वादांना फुटले तोंड
भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी महापुरुषांबाबत केलेली विधाने संपूर्ण राज्यात वादाचा विषय ठरली होती. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विवाहाबद्दलचे भाष्य असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे विधान, यावरून महाराष्ट्रातील जनभावना तीव्र होत्या. आता त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला ‘पद्मभूषण’ जाहीर झाल्याने विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
महाराष्ट्रातील सत्तांतराच्या काळात राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद आणि घटनाबाह्य असल्याचा दावा महाविकास आघाडीने सातत्याने केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये याच मुद्द्यावर बोट ठेवत, सत्तांतराचे ‘बक्षीस’ म्हणून कोश्यारींना हा पुरस्कार दिला गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा वाद समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
























































