
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये त्यांनी “जय महाराष्ट्र, शुभ प्रभात!”, असे लिहून सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
या ट्विटबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की ”सकाळी उठल्यावर आपण आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो. तसंच मी त्यांना जय महाराष्ट्र केलं व सांगितलं की हा महाराष्ट्र शिवसेना, शिवसेनेचे वाघ अद्याप जिवंत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान, अमित शहा गृहमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या तिघांनी मिळून शिवसेना फोडली, महाराष्ट्र कमजोर करायचा प्रयत्न केला. त्यांना मी सांगितलं की टायगर अभी जिंदा है… 5 जुलैला मराठी दिवसाचं आमंत्रण आम्ही त्याना देणार आहोत. त्यांनी पाहावं हा सोहळा काय असणार आहे. मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त झाला. तो विजय महाराष्ट्रद्वेष्ट्यांवरचा आहे. म्हणून त्यांना जय महाराष्ट्र केला”, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी मराठी एकजूटीबाबत बोलताना सांगितलं की, ”जेव्हा दिल्लीने अघोरी सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदिनं उसळून उभा राहिलाय” असेही त्यानी ठणकावून सांगितले.
पुढे ते म्हणाले की, ” शत्रूला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख, बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की शत्रू हा तोलामोलाचा असला पाहिजे. आम्ही त्या दुश्मनांना दाखवलं की महाराष्ट्राची एकजूट काय आहे ते. महाराष्ट्राचे दुश्मन समोर असतील तेव्हा शिवसेना, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांना लढायला मजा येईल. काल माझी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. वरळी डोमला 5 जुलैला विजय सोहळा होणार आहे. शिवसेनेने शिवतीर्थ मिळावं म्हणून अर्ज केला आहे. अर्ज अजुनही पेंडिंग आहे. अनिल परब प्रयत्न करताहेत. पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही. राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला व तो आम्ही स्वीकारला. काल आमची चर्चाही झाली. 5 जुलैला दुपारी हा कार्यक्रम असेल. त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दोन्ही ठाकरे एकत्र येतील. आम्हाला दिल्लीला हेच दाखवायचं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या, सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदिनं उसळून उभा राहिला. हेच मला मोदी, शहा व फडणवीसांना दाखवायचं आहे. त्यामुळे त्यांना आज जय महाराष्ट्र केलं.