शस्त्रपूजा करण्याचा अधिकार शिवसेनेचाच, गद्दार अमित शहांच्या जोड्यांची पूजा करतील; संजय राऊत यांचा घणाघात

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाची परंपरा आणि भक्कम एकजूट केली. त्या शिवसेनेला गद्दारांकडून हादरे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शिवसेना संपणार नाही. त्यामुळे शस्त्रपूजा करण्याचा अधिकार फक्त शिवसेनेचा आहे. गद्दार अमित शहांच्या जोडय़ांची पूजा करतील, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेनाप्रमुखांनी 65 वर्षांपूर्वी पेटवलेला शिवसेनारूपी वणवा वादळ, पावसाने विझू शकत नाही. याकडे सारा देश पाहतोय, असेही संजय राऊत म्हणाले. अनेकांनी मेळावा होणार की नाही, चिखलफेक होणार का असे प्रश्न विचारले. यावर गद्दारांवर चिखलफेक होणारच, त्यांची तीच लायकी आहे, असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. इथे पाऊस, वादळ असताना हा मेळावा आपण करतोय आणि हजारोंच्या संख्येने आपण येथे जमलेले आहात. हे शिवतीर्थ आपलं आहे आणि शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे. या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे. तेसुद्धा आपलंच मानायला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

मुंबईतील पावसात रावणाला बुडवायचे आणि दिल्लीतील रावणाला जाळायचे!

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतील रावणाला जाळायचे, असेही ते म्हणाले. लढाई मोठी आहे, यासाठी एकजूट महत्त्वाची असेल्याचेही ते म्हणाले. ‘हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नही करते, हमारी खून आखरी बुंद उद्धवजी आपके दामन पर होगी’ असेही ते म्हणाले. महाराष्ट्र आणि देशात वोटचोरी करून सत्ता मिळवली. शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घडय़ाळाची चोरी. त्यामुळे मुंबईतल्या चोर बाजाराचे नाव आता मोदी बाजार करा, असेही ते म्हणाले.’