
नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्रांसाठी आणि एपस्टीन फाईलमध्ये जो मालमसाला आहे तो रोखण्यासाठी भारतमातेला अमेरिकेला विकलं, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधांनांवर केली आहे. बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी ही टीका केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान देश विकत आहेत असा आरोप केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यावर संजय राऊत म्हणाले की, ”जेव्हापासून मोदी देशाचे पंतप्रधान झालेयत तेव्हापासून मोदींनी देश गौतम अदानीला विकला आणि आता उरलेला देश अमेरिकेला विकला. तो देखील गौतम अदानी साठीच. आपल्या उद्योगपती मित्रांसाठी भारतमातेला त्यांनी विकलं. एपस्टीन फाईलमध्ये जो मालमसाला आहे तो रोखण्यासाठी देशाला अमेरिकेला विकलं. ही तुम्हाला गुलामी नाही वाटत? ”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”ट्रम्प यांनी कायम नरेंद्र मोंदीच्या लिडरशीपवरच प्रश्न उभे केले आहेत. त्यावर नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. भाजप प्रवक्ते, संघाचे सरसंघचालक बोलत नाहीत. या एका विषयावर ते कधीच बोलत नाहीत. पण हिंदू मुसलमान झालं की ते लगेच तोंडं उचकटतात”, अशीही टीका त्यांनी केली.






























































