एकिकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो चंद्रशेखर बावनकुळे यांचा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्याकडे याच व्यक्तिचे 27 फोटो आणि व्हिडीओ असून ते टाकले तर भाजपचं दुकान बंद होईल, असा इशारा भाजपला दिला आहे.
या व्हायरल फोटोंवरून सुरू असलेल्या राजकारणाचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, फोटोतली जी व्यक्ती आहे, त्यांनी सांगावं तो मी नव्हेच. किंवा त्या पक्षाच्या लोकांनी सांगावं, की फोटोतले ते नाहीयेत. लोकं ओळखतात त्यांना असं मला कळलं. तेलगीने एका रात्रीत एक कोटी रुपये उडवले. पण मकाऊमध्ये महाराष्ट्रातला एक माणूस जाऊन साडे तीन कोटी रुपये कॅसिनोमध्ये उडवतो. म्हणजे अच्छे दिन आ गये, खऱ्या अर्थाने. इकडला महाराष्ट्रातला माणूस मकाऊला जातो. तिथे म्हणतो रेस्टॉरंटला बसलोय. बाजूला कुठे इडली सांबार वगैरे दिसतंय का तपासा. काय सँडविच दिसतंय का…रात्री बारा-साडेबारा वाजता लोकं रेस्टॉरंटला जातात. साडे तीन कोटीचे पोकर्स विकत घेतात. मस्तपैकी आरामात बसतात तिथे. बसू द्या ना. मी कुणाच्याही वैयक्तिक आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण, महाराष्ट्रात काय चाललंय? परिस्थिती काय आहे? सामाजिक वातावरण काय आहे..?
अशा वेळेला नुसते आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाहीत ना.. आम्ही एखादी गोष्ट समोर आणली की समोरच्या टोळधाडींनी अजून काहीतरी सांगायचं. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या ना आधी. काय तर म्हणे ते कुटुंबासोबत आहेत, चिनी कुटुंब आहे का? एक्सटेंन्डेड फॅमिली चिनी आहे का? काहीही बोलता? मी स्पष्ट म्हणतो की तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि 5 व्हिडीओ आहेत. पण आमच्यामध्ये तेवढी माणुसकी आहे म्हणून थोडी गंमत केली. ते 27 फोटो आणि व्हिडीओ मी टाकले, तर भाजपला दुकान बंद करावं लागेल. पण, मी ते करणार नाही. त्यांचं दुकान 2024पर्यंत चाललं पाहिजे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
काँग्रेसने याच फोटोंच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. त्या मागणीला समर्थन देताना राऊत म्हणाले की, पेमेंट डॉलर्समध्ये झालेलं आहे. नाना पटोले अत्यंत योग्य बोलत आहेत. त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. मी परत सांगतो माझ्याकडे 27 फोटो आणि व्हिडीओ आहेत. तुम्ही जी घाणेरडी ट्रोलधाड सोडली आहे, ती बंद करा नाहीतर तुम्हाला दुकान बंद करावं लागेल. मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. सगळे अन्याय अत्याचार सहन करून पोलादी भट्टीतून आमचं पोलाद तावून सुलाखून बाहेर पडलेलं आहे. आम्ही घाबरत नाही. हे बघा, माझा एक स्वभाव आहे. मी कधीही कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही. माझ्यावर किती लोकांनी टीका केली. मी तसं करत नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. पण, सुरुवात कुणी केली? त्यांनाही कळलं पाहिजे की आम्हीही हात घालू शकतो. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी सीबीआय असेल आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी सीबीआय आहेत. हा साडेतीन कोटींचा आकडा फक्त तीन तासांचा आकडा आहे. तीन तासांत साडे तीन कोटी रुपये त्या जुगारात दिवाळी आनंदाप्रित्यर्थ खर्च झाले. कोणाला आनंद मिळतो त्यांनी घ्यावा. पण महाराष्ट्रातली परिस्थिती काय? शेतकरी आत्महत्या करताहेत. लोक रस्त्यावर उतरली आहेत. आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत. आपण कुटुंबाबरोबर आहोत. कुटुंब वरती रूममध्ये आहे, आपण खाली आहात. त्यामुळे कुटुंबाच्या गोष्टी करू नका, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
आदित्य ठाकरेंच्या फोटोवरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, तो एक प्रख्यात फुटबॉलपटू आहे. भाजपवाले मुर्ख आहेत. जे मोदी पितात तेच आदित्य प्यायले. मोदींचा जो ब्रँड आहे, मोदी जे परदेशात जाऊन पितात. तोच ब्रँड आदित्य ठाकरेंकडे आहे, असा सणसणीत टोलाही राऊत यांनी हाणला.