नगरच्या मतदान संकल्पपत्राची जागतिक विक्रमामध्ये नोंद

524

लोकसभा निवडणुकीत स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्पपत्रांचा विक्रम करणार्‍या नगर जिल्हा निवडणूक यंत्रणेने विधानसभा निवडणुकीतही पुन्हा विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक 2019 मध्ये निवडणूक आयोगाच्या स्वीप- मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत ‘आमचा संकल्प 100% मतदानाचा’ या घोषवाक्यासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सुमारे 25 लाख 46 हजार 792 मतदार नागरिकांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. मुलांचा संकल्प, आई-वडिलांचा संकल्प व सामान्य नागरिकाचा संकल्प अशा विविध प्रकारांमध्ये मतदार जनजागृतीचा उपक्रम होत असताना या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे. जागतिक विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रमुख पवन सोलंकी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी व स्विप समितीस प्रदान केले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी उपक्रमात सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले. तसेच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

जिल्ह्यामध्ये सुमारे पाच हजारपेक्षा जास्त शाळांमधील अंगणवाडी पासून ते बारावीपर्यंत साधारणत: नऊ लाख तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्वीप समितीच्या संकल्पपत्र या आगळ्यावेगळ्या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना संकल्पपत्र देण्यात आले होते. संकल्पपत्र विद्यार्थ्यांनी पालकांकडून व घरातील सदस्यांकडून भरून घ्यायचे होते. यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील 20 हजारांपेक्षा जास्त शिक्षकांचा समावेश होता.जिल्ह्यातील मतदारांची संख्या 34 लाख 73 हजार 743 एवढी असताना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढावी हा या उपक्रमाचा हेतू होता. त्याचबरोबर जिल्हाभरामधील विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना देखील संकल्पपत्राचे वितरण करण्यात आले होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्टॉल लावून संकल्पपत्र मतदारांकडून भरून घेतले. त्याचबरोबर मतदार सहायता कक्ष ,मी विधानसभा बोलतेय, विधानसभेचा सिग्नल, युथ बुथ, चुनाव पाठशाला, मतदार साक्षरता क्लब, टॉक विथ कलेक्टर, सेल्फी पॉइंट, शिक्षक निवडणूक प्रशिक्षण आदी स्वीप समितीच्या विविध उपक्रमांमध्ये देखील संकल्पपत्र भरून घेण्यात आले होते.

संकल्प पत्राचे दोन भाग करण्यात आले होते यामध्ये पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याविषयी आवाहन होते.दूसऱ्या भागात पालकांनी स्वतः मतदान करू असा संकल्प करावयाचा असून त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील इतर मतदारांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करू, अशा आशयाचा मजकूर संकल्पपत्रामध्ये होता.

आपली प्रतिक्रिया द्या