
सामना प्रतिनिधी । बुलढाणा/शेगाव
श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी दरवर्षीप्रमाणे सकाळी ७ वाजता पंढरपूर वारीकरिता प्रस्थान झाले. यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी गज, अश्व, रथ, मेणा व सहाशेच्या वर वारकर्यांसह पालखीचे प्रस्थान झाले.
ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ७ वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करुन पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, संस्थानचे अध्यक्ष नारायण काका पाटील, विश्वस्त डॉ. आर. सी. डांगरा, पंकज शितुत, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, शरद शिंदे, विश्वेश्वर त्रिकाळ, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर पर्यंतचा तब्बल ३३ दिवसाचा पायदळ प्रवास करीत ७५० कि.मी.चा प्रवास करीत पालखी २१ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल. श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५१ वे वर्ष आहे. श्रींच्या पायदळ वारीचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे. १९ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी रात्री मुक्काम पारस, २० जून गायगाव रात्री मुक्काम भौरद, २१ व २२ जून रोजी अकोला, २३ जून वाडेगाव, २४ जून रोजी देऊळगाव, रात्री मुक्काम पातूर, २५ जून मेडशी रात्री मुक्काम डव्हा, २६ जून मालेगाव रात्री मुक्काम शिरपूर जैन, २७ जून चिंचाबापेन रात्री मुक्काम म्हसला पेन, २८ जून रोजी किनखेडा रात्री रिसोड येथे मुक्काम, २९ जून रोजी पानकन्हेरगाव तर रात्री मुक्काम सेनगाव, ३० जून श्रीक्षेत्र नरसी (नामदेव) रात्री डिग्रस येथे मुक्काम, १ जुलै रोजी श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तर रात्री मुक्काम जवळा बाजार, २ जुलै अडगाव रजोबा हट्टा तर रात्री मुक्काम श्रीक्षेत्र त्रिधारा, ३ जुलै रोजी परभणी, ४ जुलै रोजी ब्राह्मणगाव रात्री मुक्काम दैठणा, ५ जुलै रोजी खळी रात्री मुक्काम गंगाखेड, ६ जुलै वडगाव (दादाहरी) रात्री मुक्काम परळी, ७ जुलै परळी रात्री मुक्काज वैजनाथ, ८ जुलै कन्हेरवाडी रात्री मुक्काम अंबेजोगाई, ९ जुलै लोखंडी सावरगाव रात्री मुक्काम बोरी सावरगाव, १० जुलै गोरेगाव रात्री मुक्काम कळंब, ११ जुलै गोविंदपुर रात्री मुक्काम तेरणा साखर कारखाना, १२ जुलै किन्ही रात्री मुक्काम उपळा, १३ जुलै संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशीव, १४ जुलै वडगाव सिद्धेश्वर रात्री मुक्काम श्रीक्षेत्र तुळजापूर, १५ जुलै सांगवी रात्री मुक्काम उळे, १६ जुलै सोलापूर, १७ जुलै सोलापूर, १८ जुलै सोलापूर रात्री मुक्काम तिरट्टे, १९ जुलै कामती खुर्द (वाघोती) रात्री मुक्काम माचनूर, २० जुलै ब्रह्मपुरी रात्री मुक्काम मंगळवेढा व २१ जुलै रोजी मंगळवेढा असा प्रवास करत रात्री श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचेल.
दि. २१ ते २६ जुलै पर्यंत आषाढी महोत्सवामध्ये सहभागी होवून सहा दिवसाच्या मुक्कामानंतर २७ जुलै रोजी पालखी परतीच्या प्रवासाला श्रीक्षेत्र पंढरहून निघणार आहे. सुमारे ५५० कि.मी. पायदळ प्रवास करीत पालखी १७ ऑगस्ट रोजी संतनगरी शेगावात पोहचणार आहे. श्रींच्या पालखीचा एकूण पायदळ प्रवास १३०० कि.मी. चा आहे.





























































