
सामना प्रतिनिधी । हिंगोली
वारकरी संप्रदायात पंढरपूरच्या आषाढी वारीप्रमाणेच महत्व असलेल्या संत नामदेव महाराजांच्या जन्मगावातील नर्सी नामदेवच्या परतवारीला तब्बल दोन लाखांच्यावर भाविकांनी हजेरी लावली. दोन लाखांच्यावर भाविक येऊनही योग्य नियोजनामुळे सर्वांचे दर्शन सुलभतेने झाले. ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, संत नामदेव महाराज की जय अशा जयघोषात भगव्या पताका हाती घेतलेल्या वारकरी व भाविकांमुळे नर्सीत आज दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रति पंढरपूर अवतरले.
महाराष्ट्रासह पंजाब व उत्तर हिंदुस्थानात भागवत धर्माची पताका फडकवत प्रसार व प्रचार करणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचे जन्मस्थान हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव हे आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रख्माईच्या आषाढी एकादशीप्रमाणेच कामिका एकादशीला नर्सी येथे परतवारीचे आयोजन केले जाते. आषाढीला पंढरपूरला गेलेले भाविक परतीच्या प्रवासात नर्सी नामदेव येथील मंदिरात दर्शन घेतात. या परतवारीच्या निमित्ताने सकाळी पाच वाजता उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी सपत्नीक नर्सी येथील नामदेव मंदिरामध्ये महापुजा केली. यावेळी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, कृऊबाचे माजी सभापती व संत नामदेव मंदिर जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हा परिषद सभापती प्रतिनिधी भानुदास जाधव, शाहुराव देशमुख, विठ्ठल वाशीमकर, मंदिर जिर्णोध्दारासाठी भरीव योगदान देणारे शंकरराव पानबुडे यांच्यासह भाविक व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. ही महापुजा झाल्यावर पहाटे साडे पाच वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
जिल्ह्यातील चहुबाजुने जाणारे रस्ते नर्सीच्या दिशेने भाविकांसह वाहत होते. बासंब्यासह अन्य गावातील नागरिकांनी पायी दिंडी काढुन नर्सी येथे दर्शन घेतले. केसापुर पाटीपासुन भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दर्शनाच्या चार रांगा करुन मंदिरापर्यंत सोडण्यात आल्यामुळे भाविकांचे दर्शन सुलभ झाले. हिंगोली, वाशीम, सेनगाव, रिसोड येथुन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला. प्रसाद व पुजा साहित्याच्या विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली होती. परतवारीला आलेल्या भाविकांसाठी फराळाचे वाटपही मंदिर समिती व दानशुर नागरिकांनीकेले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तब्बल 2 लाखांच्यावर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मिळत आहे. भाविकांच्या गर्दीने नर्सी नामदेव फुलून गेले होते.


























































